विधान परिषद निवडणूक... महायुतीचे १६ उमेदवार विजयी... बघा, कुणाच्या गळ्यात पडली माळ?

Share:
Main Image
Last updated: 22-Jun-2026

मुंबई, (प्रतिनिधी) २२ जून - राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या १७ विधान परिषद जागांच्या निवडणुकीचा (Vidhan Parishad Election Result 2026) अत्यंत चुरशीचा निकाल आज जाहीर झाला. या निवडणुकीत सत्ताधारी महायुतीने जोरदार मुसंडी मारत १७ पैकी तब्बल १६ जागांवर एकतर्फी विजय मिळवला आहे. याउलट विरोधी महाविकास आघाडीची (मविआ) मात्र पूर्णपणे पिछेहाट झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, नाशिकमध्ये महायुतीला, विशेषतः शिवसेना (शिंदे गट) पक्षाला मोठा झटका बसला असून, येथे भाजपचे बंडखोर आणि अपक्ष उमेदवार गोकुळ गिते यांनी बाजी मारली आहे. या १७ जागांसाठी १८ जून रोजी मतदान पार पडले होते. मात्र, मतदानापूर्वीच ६ जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले होते, तर उर्वरित ११ जागांसाठी झालेल्या मतमोजणीचा निकाल आज स्पष्ट झाला. यामध्ये भाजपने सर्वाधिक ११ जागांवर विजय मिळवला, तर शिवसेनेला ३ आणि राष्ट्रवादी काँग्रेसला २ जागांवर यश मिळाले.

नाशिकमध्ये राजकीय उलथापालथ: गोकुळ गिते जायंट किलर!

या संपूर्ण निवडणुकीत नाशिकच्या जागेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. नाशिकमध्ये महायुतीमध्ये अंतर्गत धुसफूस पाहायला मिळाली. येथे शिवसेना (शिंदे गट) पक्षाने नरेंद्र दराडे यांना अधिकृत उमेदवारी दिली होती. मात्र, भाजपचे बंडखोर गोकुळ गिते यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवत महायुतीसमोर मोठे आव्हान उभे केले. अखेर आज जाहीर झालेल्या निकालात अपक्ष गोकुळ गिते यांनी शिवसेनेच्या नरेंद्र दराडेंचा पराभव करत दणदणीत विजय मिळवला.

विधान परिषद निवडणूक २०२६: विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी (Winner Candidate List) :

स्थानिक संस्थांच्या या निवडणुकीत विजयासाठी एकूण वैध मतांच्या ५० टक्के अधिक एक मत असा 'विजयाचा कोटा' निश्चित करण्यात आला होता. पहिल्या आणि दुसऱ्या पसंतीक्रमाच्या मतमोजणीनंतर विजयी झालेल्या उमेदवारांची यादी खालीलप्रमाणे आहे:

अ) बिनविरोध विजयी झालेले ६ उमेदवार:

१. ठाणे – रवींद्र फाटक (शिवसेना)

२. यवतमाळ – दुष्यंत चतुर्वेदी (शिवसेना)

३. रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग – अनिकेत तटकरे (राष्ट्रवादी काँग्रेस)

४. पुणे – विक्रम काकडे (राष्ट्रवादी काँग्रेस)

५. वर्धा-गडचिरोली-चंद्रपूर – अरुण लखाणी (भाजप)

६. अहिल्यानगर – प्राजक्त तनपुरे (भाजप)

ब) मतमोजणीत विजयी झालेले ११ उमेदवार:

७. छत्रपती संभाजीनगर-जालना – सुहास शिरसाट (भाजप)

८. नाशिक – गोकुळ गिते (अपक्ष - भाजप बंडखोर)

Advertisement

९. भंडारा-गोंदिया – अविनाश ब्राह्मणकर (भाजप)

१०. सांगली-सातारा – धैर्यशील कदम (भाजप)

११. परभणी-हिंगोली – सईद खान (शिवसेना)

१२. सोलापूर – राजेंद्र राऊत (भाजप)

१३. धाराशिव-लातूर-बीड – बसवराज पाटील (भाजप)

१४. नागपूर – राजीव पोतदार (भाजप)

१५. जळगाव – नंदकिशोर महाजन (भाजप)

१६. अमरावती – प्रवीण पोटे (भाजप)

१७. नांदेड – अमर राजूरकर (भाजप)

पक्षनिहाय अंतिम बलाबल:

भारतीय जनता पक्ष (BJP): ११ जागा

शिवसेना (SHS): ०३ जागा

राष्ट्रवादी काँग्रेस (NCP): ०२ जागा

अपक्ष (IND): ०१ जागा

या ऐतिहासिक विजयामुळे महायुतीचा विधान परिषदेतील दबदबा अधिक वाढला असून आगामी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर महायुतीच्या कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढवणारा हा निकाल मानला जात आहे.

Advertisement

Comments

No comments yet.