नाशिक, (प्रतिनिधी) २२ जून - महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय होईल, याचा नेम कोणीच लावू शकत नाही. गेल्या चार वर्षांत राज्याच्या राजकारणाने अनेक अनपेक्षित धक्के आणि भूकंपाचे प्रयोग पाहिले आहेत. हाच राजकीय 'सस्पेन्स' आणि हायव्होल्टेज ड्रामा आता विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने नाशिक विभागात पाहायला मिळत आहे. नाशिक विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध व्हावी, याकरिता महायुतीच्या ज्येष्ठ नेत्यांनी आकाशपातळ एक केले होते. मात्र, अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी घेतलेल्या आक्रमक पवित्र्यामुळे महायुतीच्या मनसुब्यांवर पाणी फेरले गेले आहे.
अर्ज माघारी घेण्याची अधिकृत मुदत संपलेली असली, तरी महायुतीचे संकटमोचक मंत्री गिरीश महाजन आणि मंत्री उदय सामंत यांच्याकडून अद्यापही गोकुळ गीते यांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू होते. परंतु, "आता माघार नाहीच, मी निवडणूक लढवणारच!" असा ठाम निर्धार व्यक्त करत गीते यांनी शिवसेना (शिंदे गट) व महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांच्यासमोर तगडे आव्हान उभे केले. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून, महायुतीला घाम फोडणारे हे गोकुळ गीते नेमके कोण, याची चर्चा आता रंगू लागली आहे.
कोण आहेत गोकुळ गीते? जाणून घ्या त्यांचा राजकीय प्रवास...
गोकुळ गीते हे नाशिकच्या स्थानिक राजकारणातील एक मातब्बर आणि रणनीतीकार व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात. पडद्याआडून सूत्रांची अचूक हालचाल करण्यात त्यांचा हातखंडा आहे.
गणेश गीते यांचे बंधू आणि पडद्यामागचे सूत्रधार: गोकुळ गीते हे नाशिक महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती आणि भाजप नेते गणेश गीते यांचे सख्खे बंधू आहेत. गणेश गीते यांच्या आजवरच्या संपूर्ण राजकीय वाटचालीत आणि यशात गोकुळ गीते यांचा पडद्यामागून मोठा वाटा राहिला आहे.
२०२४ च्या विधानसभेचे किंगमेकर: २०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत गणेश गीते यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडून निवडणूक लढवली होती. या अत्यंत चुरशीच्या निवडणुकीचे संपूर्ण नियोजन, रणनीती आणि प्रचाराच्या कॅम्पेनची धुरा गोकुळ गीते यांनीच यशस्वीपणे सांभाळली होती.
सहकार आणि स्थानिक पातळीवर पकड: गोकुळ गीते हे पिंपळगाव बसवंत बाजार समितीवर सलग दोन वेळा संचालक म्हणून निवडून आले आहेत. तसेच सध्या त्यांनी निफाड तालुक्यातील सायखेडा जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवण्याची पूर्वतयारी सुरू केली असून स्थानिक पातळीवर त्यांची मोठी ताकद मानली जाते.
संपत्तीच्या बाबतीतही दांडगे: गोकुळ गीते हे केवळ राजकीयदृष्ट्याच नव्हे, तर आर्थिकदृष्ट्याही अत्यंत सक्षम आहेत. महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांच्या तुलनेत गोकुळ गीते यांची संपत्ती अधिक असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
"आता माघारीचा विषय संपला!" : गोकुळ गीतेंचा महायुतीला थेट इशारा
शुक्रवारी (५ जून) प्रसारमाध्यमांशी बोलताना गोकुळ गीते यांनी आपली भूमिका अत्यंत स्पष्ट शब्दात मांडली. महायुतीच्या नेत्यांकडून सुरू असलेल्या मनधरणीच्या प्रयत्नांना त्यांनी लोकशाहीच्या नियमांचा दाखला देत पूर्णविराम दिला आहे.