येवल्यात वाळूमाफियांची मुजोरी... नायब तहसीलदाराचा गळा आवळून जीवे मारण्याचा प्रयत्न...

Share:
Main Image
Last updated: 21-Jun-2026

येवला, (प्रतिनिधी) २१ जून - अवैध मुरूम उत्खनन आणि वाहतुकीवर धडक कारवाई करण्यासाठी गेलेल्या निवासी नायब तहसीलदारांना मारहाण करून, त्यांचा गळा आवळून जीवे मारण्याचा थरारक प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना शनिवारी (दि. २०) दुपारी पारेगाव (ता. येवला) येथे घडली. याप्रकरणी येवला शहर पोलीस ठाण्यात दोन संशयितांविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्यासह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल बद्रीनाथ आहेर व शुभम परदेशी अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. या हल्ल्यात निवासी नायब तहसीलदार पंकज कृष्णराव नेवसे हे जखमी झाले आहेत.

नेमकी घटना काय?

पारेगाव गावालगत असलेल्या तळ्यातून बेकायदेशीरपणे मुरुमाचे उत्खनन व वाहतूक सुरू असल्याची माहिती येवल्याचे तहसीलदार आबा महाजन यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी निवासी नायब तहसीलदार पंकज नेवसे यांना कारवाईचे आदेश दिले. आदेश मिळताच नेवसे हे ग्राम महसूल अधिकारी संतोष आठवले व वैभव भड यांच्यासह दुपारी पारेगाव येथील तळ्यावर पोहोचले.

तेथे (MH-17 CV-4522) क्रमांकाचा मुरुमाने पूर्ण भरलेला एक डंपर महसूल पथकाला आढळून आला. यावेळी तेथे हजर असलेले संशयित राहुल आहेर आणि शुभम परदेशी यांच्याकडे पथकाने मुरूम उत्खनन व वाहतुकीच्या परवान्याची (रॉयल्टी) मागणी केली. मात्र, कोणतीही वैध कागदपत्रे न दाखवता दोघांनी महसूल पथकाशी हुज्जत घालत अरेरावीची भाषा सुरू केली.

गळा आवळून जीवे मारण्याचा प्रयत्न

Advertisement

वाद विकोपाला गेल्यानंतर संशयित राहुल आहेर याने थेट नायब तहसीलदार पंकज नेवसे यांच्यावर हल्ला चढवला. त्याने नेवसे यांना बेदम मारहाण करून खाली पाडले, तसेच त्यांचा गळा आवळून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यात नेवसे यांना दुखापत झाली. शासकीय कारवाईत अडथळा आणत संशयितांनी महसूल पथकाला गंभीर धमक्याही दिल्या.

पोलीस निरीक्षकांसमोरही शिवीगाळ सुरूच!

घटनेची माहिती मिळताच येवला शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक योगेश घोरपडे हे तातडीने फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. मात्र, पोलिसांच्या उपस्थितीतही संशयितांची मुजोरी सुरूच होती आणि ते महसूल अधिकाऱ्यांना शिवीगाळ करत होते, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

'भारतीय न्याय संहिते'नुसार गुन्हा दाखल

या प्रकरणी जखमी नायब तहसीलदार पंकज नेवसे यांच्या फिर्यादीवरून येवला शहर पोलिसांत संशयित राहुल आहेर आणि शुभम परदेशी यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील विविध गंभीर कलमांसह महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे महसूल वर्तुळात तीव्र संताप व्यक्त होत असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कोते करत आहेत.

Advertisement

Comments

No comments yet.