ओझर, (प्रतिनिधी) २० जून - पत्ता विचारण्याचा बहाणा करत चार जणांच्या टोळीने एका हॉटेल व्यावसायिकाला बळजबरीने कारमध्ये डांबून त्याचे अपहरण केले. चालत्या कारमध्ये मारहाण व दमदाटी करत लुटारूंनी व्यावसायिकाकडील रोकड, मोबाईल आणि घड्याळ असा एकूण २१ हजार ५०० रुपयांचा ऐवज लुटून पोबारा केला. ही थरारक घटना कसबे सुकेणे ते दावचवाडी मार्गावर गुरुवारी (दि. १८) मध्यरात्री घडली. याप्रकरणी हॉटेल व्यावसायिक प्रविण मनोहर सोनवणे (रा. कसबे सुकेणे, ता. निफाड) यांनी ओझर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, पोलिसांनी चारही अज्ञात भामट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
नेमकी घटना काय?
प्रविण सोनवणे यांचे कसबे सुकेणे गावातील बसस्टँड भागात 'मनोहर' नावाचे हॉटेल आहे. गुरुवारी मध्यरात्री नेहमीप्रमाणे हॉटेल बंद करून, गल्ल्यातील रोकड घेऊन ते घराकडे पायी निघाले होते. याच दरम्यान कसबे सुकेणे ते दावचवाडी रस्त्यावर एका कारमधून आलेल्या चार जणांच्या टोळीने सोनवणे यांना गाठले.
पत्ता विचारण्याचा बहाणा नडला!
संशयितांनी कार थांबवून सोनवणे यांना "पिंपळस रस्ता कोणता आहे?" अशी विचारपूस केली. सोनवणे काही समजण्याच्या आतच कारमधील भामटे खाली उतरले आणि त्यांनी सोनवणे यांना बळजबरीने कारमध्ये ओढून बसवले.
चालत्या कारमध्ये मारहाण आणि लूटमार
अपहरण केल्यानंतर लुटारूंनी कार दावचवाडीच्या दिशेने सुसाट वेगाने पळवली. प्रवासादरम्यान सोनवणे यांना शिवीगाळ, दमदाटी करत जबर मारहाण करण्यात आली. त्यांच्या खिशातील हॉटेलच्या व्यवसायाची १५ हजार रुपयांची रोकड, मोबाईल फोन आणि मनगटी घड्याळ असा एकूण २१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल भामट्यांनी जबरदस्तीने काढून घेतला.
यानंतर दावचवाडी शिवारातील एका निर्जन ठिकाणी सोनवणे यांना कारमधून खाली ढकलून देत लुटारू अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. या घटनेमुळे परिसरात व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. ओझर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन कंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे.