जागतिक योग दिन... चालकांसाठी नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनकडून विशेष योग शिबिर

Share:
Main Image
Last updated: 20-Jun-2026

नाशिक, (प्रतिनिधी) २० जून - जागतिक योग दिनाच्या निमित्ताने नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशन आणि नमोयोगा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने वाहतूक क्षेत्रातील चालक बांधवांसाठी आडगाव ट्रक टर्मिनल मध्ये योग दिवसाच्या एक दिवस आधीच विशेष योग शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरामध्ये योग शिक्षक प्रतिमा फड-बोडके यांनी विविध योगासने, प्राणायाम आणि ध्यान यांचे प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले. तसेच योगशिक्षक राजेंद्र फड यांनी योगाचे दैनंदिन जीवनातील महत्त्व आणि विशेषतः चालकांसाठी त्याचे फायदे याविषयी सविस्तर माहिती दिली. यावेळी उपस्थित चालक बांधवांनी योगाभ्यासाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला आणि भविष्यात नियमित योग करण्याचा संकल्प केला. 

नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशन च्या वतीने समाजाच्या आणि देशाच्या प्रगतीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या चालकांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. वाहतूक क्षेत्रातील चालक हे देशाच्या अर्थचक्राला गती देणारे महत्त्वाचे घटक आहेत. रात्रंदिवस प्रवास,अनियमित आहार,अपुरी झोप, ताणतणाव आणि रस्त्यांवरील मर्यादित सुविधा अशा अनेक अडचणींना सामोरे जात असतानाही ते आपले कर्तव्य अत्यंत जबाबदारीने पार पाडत असतात. मात्र, समाजासाठी इतके महत्त्वाचे योगदान देणारा हा घटक अनेकदा दुर्लक्षित राहतो. याच पार्श्वभूमीवर चालकांचे शारीरिक व मानसिक आरोग्य सक्षम करण्यासाठी योग शिबिराचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष पी.एम सैनी, चेअरमन राजेंद्र फड, सचिव बजरंग शर्मा, उपाध्यक्ष शंकर धनावडे, आर्थिक सल्लागार सुभाष जांगडा, सियाराम शर्मा, महावीर शर्मा, संजय जैन, राजेश इसरवाल, भगवान कटीरा आदी उपस्थित होते.

योगाभ्यासामुळे चालकांना अनेक प्रकारचे आरोग्यदायी लाभ मिळू शकतात. नियमित योग केल्याने पचनशक्ती सुधारते, स्मरणशक्ती वाढते, दृष्टी अधिक चांगली राहण्यास मदत होते, राग आणि मानसिक ताण कमी होतो तसेच काम करताना येणारा थकवा आणि कंटाळा दूर होतो. त्यामुळे वाहन चालविताना एकाग्रता वाढून अपघातांची शक्यता कमी होण्यास मदत होते. त्यामुळे चालकांसाठी हा उपक्रम अतिशय महत्वाचा आहे.

Advertisement

- योगशिक्षक राजेंद्र फड

नमोयोगा फाउंडेशन ही संस्था चालकांचे आरोग्य सुदृढ राहावे, त्यांना आवश्यक प्रशिक्षण मिळावे आणि रस्ते अपघातांचे प्रमाण कमी व्हावे यासाठी सातत्याने कार्यरत आहे. योग, आरोग्य जनजागृती, प्रशिक्षण शिबिरे आणि सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून चालकांमध्ये सुरक्षित वाहनचालना व निरोगी जीवनशैलीचा संदेश पोहोचविण्याचे काम संस्था करत असल्याची माहिती योग शिक्षिका प्रतिमा फड-बोडके यांनी दिली.

जागतिक योग दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम चालकांच्या आरोग्याबाबत समाजात सकारात्मक जागरूकता निर्माण करणारा ठरला. निरोगी चालक, सुरक्षित प्रवास आणि अपघातमुक्त भारत या संकल्पनेला बळ देणारा हा उपक्रम सर्व स्तरातून कौतुकास पात्र ठरत आहे.

Advertisement

Comments

No comments yet.