नाशिक, (प्रतिनिधी) २० जून - नाशिक शहर व परिसरातील पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहराला खऱ्या अर्थाने 'हरित शहर' बनवण्यासाठी 'उन्नत नाशिक अभियान' अंतर्गत ‘मिशन ग्रीन मान्सून’ (हरित कुंभ - हरित मान्सून) हा भव्य उपक्रम राबविण्यात येणार आहे. या मान्सून हंगामात नाशिक शहर आणि परिसरात तब्बल १ लाख देशी वृक्षांची लागवड करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. राज्याचे मंत्री ना. गिरीश महाजन यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्राद्वारे या मोहिमेचे सूक्ष्म नियोजन करण्याच्या आणि सर्व संबंधित विभागांना उद्दिष्ट नेमून देण्याच्या सूचना दिल्या आहेत.
तीन मुख्य स्तंभांवर लोकचळवळ
नाशिक शहराला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर एक वेगळी ओळख मिळवून देण्यासाठी १ मे २०२६ रोजी 'उन्नत नाशिक अभियान' ही व्यापक लोकचळवळ सुरू करण्यात आली आहे. स्वच्छता, सौंदर्यीकरण आणि हरित उपक्रम या तीन मुख्य स्तंभांवर हे अभियान आधारलेले आहे. यापूर्वी १७ मे रोजी महापालिका क्षेत्रात ४ हजार देशी वृक्षांचे रोपण करण्यात आले होते, तर ५ जून रोजी 'जागतिक पर्यावरण दिना'निमित्त नंदिनी नदीची महास्वच्छता करण्यात आली होती. याच दिवशी जमा केलेल्या देशी बियाण्यांचा वापर आता या मान्सून मोहिमेत केला जाणार आहे.
२८ जून ते २५ ऑक्टोबर: प्रत्येक रविवारी होणार 'प्लँटेशन'
'मिशन ग्रीन मान्सून' अंतर्गत वृक्षलागवड अभियानाचा मुख्य कालावधी २८ जून ते २५ ऑक्टोबर २०२६ असा असणार आहे. या कालावधीत येणाऱ्या प्रत्येक रविवारी नाशिककरांच्या आणि विविध संस्थांच्या सोयीसाठी ही मोहीम राबविली जाईल. प्रत्येक रविवारी वेगवेगळ्या शासकीय-निमशासकीय आस्थापना, शैक्षणिक संस्था आणि सामाजिक संघटनांच्या माध्यमातून नियोजनबद्ध पद्धतीने वृक्षारोपण केले जाईल. यामध्ये पारंपरिक लागवडीसोबतच उपलब्ध बियाण्यांचे 'सीड बॉल्स' (Seed Balls) तयार करून त्यांचे रोपण करणे आणि प्रसिद्ध *'कुसमाडी पॅटर्न'*च्या माध्यमातून वृक्षलागवड करण्यावर भर दिला जाणार आहे.
'मान्सून वृक्ष लागवड समिती' स्थापन होणार
१ लाख वृक्षलागवडीचे हे महाकाय उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर मोठी तयारी सुरू आहे. या मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कुंभमेळा प्राधिकरण, महानगरपालिका, जलसंपदा विभाग, सामाजिक संस्था, निसर्गप्रेमी आणि माध्यमसमूहांच्या प्रतिनिधींची एक उच्चस्तरीय "मान्सून वृक्ष लागवड समिती" गठित करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये, औद्योगिक व व्यावसायिक आस्थापना, क्रीडा व पोलीस अकॅडमी यांना त्यांच्या क्षमतेनुसार वृक्षलागवडीचे निश्चित उद्दिष्ट (Target) नेमून दिले जाणार आहे.
नाशिक खऱ्या अर्थाने 'हरित व सुंदर' बनेल!
"नाशिककरांच्या सक्रिय लोकसहभागातून झालेल्या नंदिनी नदीच्या स्वच्छतेनंतर आता 'मिशन ग्रीन मान्सून' अंतर्गत नाशिक शहर कुंभमेळ्यापूर्वी खऱ्या अर्थाने 'हरित व सुंदर' बनण्यास सुरुवात होईल, अशी मला खात्री आहे. पर्यावरण रक्षणाच्या या महायज्ञात केवळ झाडे लावणे नव्हे, तर त्यांचे संवर्धन करणे हा आपला ध्यास असला पाहिजे. प्रत्येक नाशिककराने या मोहिमेत दर रविवारी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे."
— गिरीश महाजन, मंत्री, महाराष्ट्र राज्य.