नाशिक, (प्रतिनिधी) २० जून - आदिवासी समाजातील युवक-युवतींना विमान वाहतूक क्षेत्रात (Aviation Sector) आपले करिअर घडविण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था (TRTI, पुणे) आणि नॅशनल फ्लाईंग ट्रेनिंग इन्स्टिट्यूट (NFTI, गोंदिया) यांच्या संयुक्त विद्यमाने व्यावसायिक वैमानिक परवाना (Commercial Pilot License – CPL) प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या प्रशिक्षणासाठी अनुसूचित जमातीतील (ST) पात्र उमेदवारांनी ३० जून २०२६ पर्यंत आपले अर्ज 'प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी, एकात्मिक आदिवासी प्रकल्प, नाशिक' यांच्या कार्यालयात सादर करावेत, असे आवाहन प्रकल्प अधिकारी अर्पिता ठुबे यांनी केले आहे.
आवश्यक शैक्षणिक पात्रता:
उमेदवाराने भौतिकशास्त्र (Physics), गणित (Maths) आणि इंग्रजी विषयांसह १२ वीची परीक्षा किमान ५१ टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी. (सीबीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी 'ग्रेड सी-१' आवश्यक).
अभियांत्रिकी पदवीधरांना सूट: जे उमेदवार 'इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट' आहेत आणि त्यांना ५१ टक्क्यांपेक्षा जास्त गुण आहेत, त्यांना १२ वीच्या भौतिकशास्त्र व गणित विषयांच्या गुणांच्या अटीतून सूट दिली जाईल.
परदेशी बोर्ड किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलेल्या उमेदवारांना 'एआययू' (AIU) कडून शैक्षणिक अर्हता समतुल्य प्रमाणात प्रमाणित करून घेणे अनिवार्य आहे.
शारीरिक क्षमता आणि इतर अटी:
वैद्यकीय निकष: उमेदवारांकडे 'डीजीसीए' (DGCA) वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रमाणित केलेले वर्ग १ व २ प्रमाणपत्र असावे. (वर्ग १ प्रमाणपत्र नसलेले उमेदवार इंडिगो प्रोग्रामसाठी वर्ग २ प्रमाणपत्रासह अर्ज करू शकतात).
उमेदवार शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम असावा. आपण कोणत्याही औषधोपचाराखाली किंवा मानसिक आरोग्य समस्येचा सामना करत नसल्याचे स्वयंघोषणा पत्र देणे आवश्यक आहे.
उमेदवाराकडे वैध भारतीय पासपोर्ट असणे बंधनकारक आहे.
वय, उत्पन्न आणि निवासी अटी:
वयोमर्यादा: 'सीपीएल' (CPL) आणि 'Airbus A-320 Type Rating' प्रशिक्षण कार्यक्रमासाठी उमेदवाराचे वय १८ ते ३५ वर्षे दरम्यान असावे.
उत्पन्न मर्यादा: उमेदवाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ८ लाख रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
निवासी व जात प्रमाणपत्र: उमेदवार महाराष्ट्र राज्याचा अधिवासी (Domicile) असावा. अर्जासोबत अनुसूचित जमातीचे (ST) जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र (Cast Validity) जोडणे अनिवार्य आहे.
आवाहनाचा सुवर्णक्षण:
"आदिवासी समाजातील युवक-युवतींनी या नावीन्यपूर्ण आणि प्रतिष्ठेच्या संधीचा लाभ घ्यावा. विमान वाहतूक क्षेत्रात स्वतःचे करिअर घडवून देश-विदेशात आपल्या कौशल्याचा डंका वाजवावा."
— अर्पिता ठुबे, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी, नाशिक.