दुचाकीस्वाराला चिरडून पसार झालेला कारचालक गजाआड... ७५ सीसीटीव्ही फुटेज ठरले गेमचेंजर...

Share:
Main Image
Last updated: 19-Jun-2026

नाशिक, (प्रतिनिधी) १९ जून - द्वारकाकडून नाशिकरोडच्या दिशेने भरधाव जाणाऱ्या कारने दुचाकीला धडक देऊन एकाचा बळी घेतल्याची धक्कादायक घटना नुकतीच घडली होती. अपघात केल्यानंतर घटनास्थळावरून पसार झालेल्या मद्यधुंद कारचालकाचा शोध घेण्यात पोलिसांना अखेर यश आले आहे. शहर गुन्हे शाखेच्या युनिट २ च्या पथकाने तब्बल ७५ हून अधिक सीसीटीव्ही फुटेजची कसून पाहणी करत संशयित आरोपीच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांनी त्याच्याकडून अपघातातील विनानंबर कार जप्त केली असून पुढील कारवाईसाठी त्याला उपनगर पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. जय राकेश रावळ (वय ३४, रा. हिरेनगर, नाशिक-पुणे रोड) असे अटक करण्यात आलेल्या संशयित कारचालकाचे नाव आहे.

नेमकी घटना काय?

गेल्या रविवारी (दि. १४) मध्यरात्री कामत हॉटेल परिसरात हा भीषण अपघात झाला होता. संशयित आरोपी जय रावळ हा आपल्या विनानंबर कारने द्वारकाकडून नाशिकरोडच्या दिशेने प्रचंड वेगात जात होता. यावेळी मद्याच्या नशेत असलेल्या जयने एका दुचाकीला जोराची धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, यामध्ये दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. अपघात घडताच संशयित चालक कारसह घटनास्थळावरून फरार झाला होता. याप्रकरणी मृत व्यक्तीच्या मुलाने दिलेल्या फिर्यादीवरून उपनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

७५ सीसीटीव्ही फुटेज आणि पोलिसांचा 'सुतावरून स्वर्ग'

अपघातानंतर वाहन विनानंबर असल्याने पोलिसांसमोर आरोपीला शोधण्याचे मोठे आव्हान होते. उपनगर पोलिसांसह शहर गुन्हे शाखेचे युनिट २ चे पथक समांतर तपास करत होते. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिसरातील सीसीटीव्ही फुटेज गोळा करण्यास सुरुवात केली.

कारचा मार्ग शोधण्यासाठी पथकाने परिसरातील तब्बल ७५ हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयित जय रावळ याचा माग काढत त्याला बेड्या ठोकल्या. पोलिसांच्या चौकशीत त्याने मद्याच्या नशेत हा अपघात केल्याची कबुली दिली आहे.

Advertisement

चार लाखांची कार जप्त

पोलिसांनी संशयित आरोपीकडून अपघातात वापरलेली सुमारे चार लाख रुपये किमतीची कार जप्त केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीला कारसह पुढील कायदेशीर कारवाईसाठी उपनगर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

कारवाई करणारे पोलीस पथक

ही धडक कारवाई गुन्हे शाखेचे प्रभारी हेमंत तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली 

सहाय्यक निरीक्षक डॉ. समाधान हिरे

उपनिरीक्षक संजय सानप

पोलीस हवालदार अतुल पाटील, वाल्मिक चव्हाण, मनोज परदेशी आणि सुनील खैरणार यांच्या पथकाने केली. पोलिसांच्या या कामगिरीचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.

Advertisement

Comments

No comments yet.