दुचाकी बाजूला घेण्यास सांगणे पडले महाग... टोळक्याकडून टँकर चालकाला दात पडेपर्यंत मारहाण...

Share:
Main Image
Last updated: 19-Jun-2026

नाशिक, (प्रतिनिधी) १९ जून - रस्त्यात दुचाकी लावून मद्यपान करत बसलेल्या टोळक्याला दुचाकी बाजूला घेण्याची विनंती करणे एका टँकर चालकाला भलतेच महागात पडले आहे. संतप्त मद्यपी टोळक्याने चालकाला शिवीगाळ करत त्याच्यावर भीषण दगडफेक केली. या जीवघेण्या हल्ल्यात टँकर चालक गंभीर जखमी झाला असून त्याचे दातही निखळले आहेत. ओझर शिवारात मंगळवारी (दि. १६) सायंकाळच्या सुमारास ही खळबळजनक घटना घडली. याप्रकरणी ओझर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दोघा संशयितांना तात्काळ अटक केली आहे, तर त्यांच्या तीन साथीदारांचा शोध सुरू आहे. चेतन सोमनाथ पवार (वय २९, रा. बाणगंगानगर, ओझर) व यश उमेश शेवरे (वय १९, रा. हुजरे मळा, ओझर) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.

तर त्यांचे साथीदार सचिन बाजीराव जाधव (रा. आमदार वस्ती, ओझर), राज मधुकर पवार (रा. बाणगंगानगर) व कार्तिक गायकवाड (पूर्ण नाव, पत्ता माहीत नाही) या तिघांचा पोलीस शोध घेत आहेत. याप्रकरणी टँकर चालक तुषार विश्वनाथ शिंदे (वय ४२, रा. दहावा मैल, जानोरी रोड, शिंदे मळा, ओझर, ता. निफाड) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.

नेमकी घटना काय?

Advertisement

फिर्यादी तुषार शिंदे यांचा पाणी वितरणाचा व्यवसाय आहे. मंगळवारी सायंकाळच्या सुमारास ते आपला पाण्याचा टँकर (क्रमांक MH 12 EQ 1734) घेऊन प्रकाश धारीवाल यांच्या शेतातील विहिरीवरून पाणी भरून जऊळके शिवारातील 'वृंदा ग्रो' कंपनीत खाली करण्यासाठी जात होते. विहिरीपासून काही अंतरावरच संशयित आरोपी रस्त्यात आपल्या दुचाकी लावून मद्यपान करत बसले होते. टँकर घेऊन जाण्यास रस्ता नसल्याने शिंदे यांनी आवाज देऊन त्यांना दुचाकी बाजूला लावण्याची विनंती केली.

शिवीगाळ अन् दगडफेक

शिंदे यांनी केवळ दुचाकी बाजूला घेण्यास सांगितल्याचा राग या मद्यधुंद टोळक्याला आला. त्यांनी अत्यंत आक्रमक होत शिंदे यांना थेट जीवे मारण्याची धमकी दिली आणि त्यांच्यावर विटा-दगडांनी हल्ला चढवला. या दगडफेकीत शिंदे यांच्या डोक्याला आणि तोंडाला गंभीर दुखापत झाली. मारहाण इतकी भीषण होती की, दगड लागल्याने शिंदे यांचे दातही निखळले आहेत.

घटनेची माहिती मिळताच ओझर पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवून चेतन पवार आणि यश शेवरे या दोघांना बेड्या ठोकल्या. या गुन्ह्यातील फरार असलेल्या अन्य तीन संशयितांचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार बागुल करत आहेत.

Advertisement

Comments

No comments yet.