जीव वाचवण्यासाठी धरणात घेतली उडी... अखेर पाण्यात बुडून मृत्यू... प्रत्यक्षदर्शीच्या साक्षीने फुटले बिंग...

Share:
Main Image
Last updated: 18-Jun-2026

लासलगाव, (प्रतिनिधी) १८ जून - काही लोकांकडून होणाऱ्या मारहाणीच्या आणि जीवाच्या भीतीने धरणातील अथांग पाण्यात उडी घेतलेल्या एका व्यक्तीचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना निफाड तालुक्यातील खडकमाळेगाव येथे घडली आहे. हा घातपात नसून संशयितांनी पाण्यातही पाठलाग सुरू ठेवल्यामुळेच हा दुर्दैवी अंत झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दत्तू गांगुर्डे असे मृत व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी संशयित अमोल ऊर्फ आकाश गारे व त्याच्या एका साथीदाराविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. मृत दत्तू गांगुर्डे यांचा मुलगा सागर गांगुर्डे याने दिलेल्या तक्रारीवरून लासलगाव पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

नेमका काय घडला प्रकार?

मृत दत्तू गांगुर्डे हे बुधवारी (१० जून) सकाळच्या सुमारास कामधंदा शोधण्यासाठी खडकमाळेगाव शिवारात गेले होते. तेथील धरणाजवळ काम करणाऱ्या काही लोकांशी त्यांचा अचानक वाद झाला. या वादाचे रूपांतर नंतर झटापटीत झाले. संशयित आपल्याला बेदम मारहाण करतील या भीतीने गांगुर्डे यांनी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तिथून पळ काढला.

पाण्यात उडी मारली, तरीही पाठलाग सोडला नाही!

Advertisement

गांगुर्डे पळत असताना संशयित अमोल ऊर्फ आकाश गारे आणि त्याच्या सोबत असलेल्या अन्य एकाने त्यांचा तीव्र पाठलाग सुरू केला. संशयितांच्या तावडीतून सुटण्यासाठी गांगुर्डे यांनी समोरच असलेल्या धरणाच्या खोल पाण्यात उडी घेतली. मात्र, तरीही संशयितांनी त्यांचा पाठलाग सोडला नाही. पाण्यात उडी घेऊनही संशयित मागेच असल्याने गांगुर्डे यांना पाण्याच्या बाहेर येता आले नाही आणि अखेर त्यांचा पाण्यात बुडून करुण अंत झाला.

प्रत्यक्षदर्शीच्या साक्षीने गुपितावरून पडदा उठला!

गेल्या बुधवारी खडकमाळेगाव शिवारातील धरणात दत्तू गांगुर्डे यांचा मृतदेह तरंगताना आढळून आला होता. सुरुवातीला हा अपघात किंवा पाण्यात बुडून झालेला सामान्य मृत्यू असल्याचा प्राथमिक निष्कर्ष काढण्यात येत होता. मात्र, पोलिसांनी ही आत्महत्या आहे की घातपात, यादृष्टीने सखोल तपास सुरू ठेवला.

दरम्यान, या संपूर्ण घटनेचा थरार पाहिलेल्या एका प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराने पोलिसांसमोर येऊन नेमका काय प्रकार घडला होता, याचा खुलासा केला. या साक्षीदारामुळेच गांगुर्डे यांच्या मृत्यूमागचे सत्य समोर आले.

लासलगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मोहीन पाटील या प्रकरणाचा पुढील तपास करत असून, संशयितांच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत.

Advertisement

Comments

No comments yet.