सहकार अधिकाऱ्यासह दोन ऑडिटर एसीबीच्या जाळ्यात... यासाठी मागितले ३० हजार...

Share:
Main Image
Last updated: 16-Jun-2026

भुसावळ, (प्रतिनिधी) १६ जून - भुसावळ येथील सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था कार्यालयातील सहकार अधिकारी आणि दोन प्रमाणित लेखापरीक्षकांना (ऑडिटर्स) १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) मंगळवारी (१५ जून) रंगेहात अटक केली. या कारवाईमुळे जळगाव जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात आणि शासकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. याप्रकरणी भुसावळ येथील बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे:

१) विजय विनायकराव गरूड (वय ५२), सहकार अधिकारी (वर्ग-३), रा. धुळे.

२) सुरेश जनार्दन विसपुते (वय ६२, खासगी इसम), प्रमाणित लेखापरीक्षक, रा. माऊलीनगर, भुसावळ.

३) हेमंत प्रकाश काळे (वय ४०, खासगी इसम), प्रमाणित लेखापरीक्षक, रा. विवेकानंद नगर, जळगाव.

नेमके प्रकरण काय?

Advertisement

तक्रारदार हे भुसावळ येथील रहिवासी असून त्यांना सावकारी व्यवसाय करण्यासाठी सावकारी परवाना हवा होता. यासाठी त्यांनी भुसावळ येथील सहाय्यक निबंधक कार्यालयात अर्ज केला होता. हा परवाना काढून देण्याच्या मोबदल्यात सहकार अधिकारी विजय गरूड यांनी सुरुवातीला २०,००० रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी २३ मे २०२६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव यांच्याकडे रीतसर तक्रार नोंदवली.

अशी झाली कारवाई:

तक्रारीच्या अनुषंगाने एसीबीच्या पथकाने लाचेच्या मागणीची पडताळणी केली. दरम्यान, आरोपी सुरेश विसपुते याने तक्रारदाराकडे परवाना काढून देण्यासाठी स्वतःसाठी आणि हेमंत काळे (प्रमाणित लेखापरीक्षक) यांच्यासाठी एकूण ३०,००० रुपयांच्या लाचेची मागणी केली.

अखेर १५ जून रोजी भुसावळ शहरातील नाहटा चौफुली परिसरात एसीबीने सापळा रचला. आरोपी सुरेश विसपुते याने ३०,००० रुपयांपैकी १०,००० रुपयांची लाचेची रक्कम तक्रारदाराकडून पंचांसमक्ष स्वतः स्वीकारली. ही रक्कम त्याने सहकार अधिकारी विजय गरूड यांच्या सांगण्यावरून फोन पे द्वारे पाठवली म्हणून या तिघांविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ चे कलम ७, ७ अ व १२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नागरिकांना आवाहन

लाचलुचपत विभागाचे पर्यवेक्षण अधिकारी आणि पोलीस अधीक्षक भरत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी, सुशिल दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रेश्मा अवतारे आणि त्यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली. लाचखोरीसंबंधी काही माहिती असल्यास नागरिकांनी टोल फ्री क्रमांक १०६४ किंवा व्हॉट्सॲप क्रमांक ८९८३४६९०६४ वर संपर्क साधावा, असे आवाहन एसीबीने केले आहे.

Advertisement

Comments

No comments yet.