अंदरसुल आणि पिंपळगाव लेप येथे शाळा प्रवेशोत्सव उत्साहात... माजी खासदार समीर भुजबळ यांची प्रमुख उपस्थिती

Share:
Main Image
Last updated: 15-Jun-2026

येवला, (प्रतिनिधी) १५ जून - नवीन शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या प्रारंभानिमित्त येवला-लासलगाव विधानसभा मतदारसंघातील अंदरसुल व पिंपळगाव लेप येथे शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम माजी खासदार समीरभाऊ भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला. येवला-लासलगाव विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या तब्बल ५७,५०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन समीर भुजबळ यांनी केले.एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी समीर भुजबळ म्हणाले की, "शालेय जीवन हा प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्वात सुंदर आणि सोनेरी काळ असतो. आज आपण ज्या स्थानावर आहोत आणि जे यश प्राप्त केले आहे, त्यामागे आपल्या शाळेचे व शिक्षकांचे मोलाचे योगदान आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे ही आपली सामाजिक जबाबदारी आहे. छगनराव भुजबळ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मतदारसंघातील सर्व विद्यार्थ्यांपर्यंत शैक्षणिक साहित्य पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे."

"मुलांच्या आयुष्यात शिक्षण ही सर्वात मोठी गुंतवणूक आहे. आजचे विद्यार्थी हे उद्याचे डॉक्टर, अभियंते, शिक्षक, शास्त्रज्ञ, प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधी असतील. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक आहे," असेही ते म्हणाले.

Advertisement

कार्यक्रमादरम्यान ग्रामस्थांनी विविध विकासकामांसंदर्भात मागण्या मांडल्या. यावर सकारात्मक प्रतिसाद देत समीरभाऊ भुजबळ यांनी आगामी काळात परिसरातील विकासकामे, शाळांच्या अतिरिक्त वर्गखोल्या तसेच इतर शैक्षणिक सुविधांसाठी आवश्यक पाठपुरावा करण्यात येईल, असे आश्वासन दिले. यावेळी अंदरसुल येथील जिल्हा परिषद शाळेस समीर भुजबळ यांच्या वतीने ५ संगणकांची भेट देण्यात आली. या उपक्रमाचे शिक्षक, विद्यार्थी, पालक व ग्रामस्थांनी स्वागत केले.

कार्यक्रमास जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष राधाकिसन आप्पा सोनवणे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विधानसभा अध्यक्ष वसंतराव पवार, पक्षाचे सरचिटणीस दिलीप खैरे, किसनकाका धनगे, मकरंद सोनवणे, लताबाई जानराव, प्रकाशजी साबरे, बाळासाहेब काळे, सचिन कळमकर, झुंजारराव देशमुख, महेश देशमुख, योगेश जागीरदार, सुनील देशमुख, शहराध्यक्ष दत्ता निकम, अण्णासाहेब ढाले, दादा देशमुख, तहसीलदार आबा महाजन, गटविकास अधिकारी संदीप वायाळ, गटशिक्षणाधिकारी संजय कुशाळकर, मुख्याध्यापक संतोष कुमावत, मुख्याध्यापक बाळासाहेब वीरगळ यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेवटी, "एकही मूल शिक्षणापासून वंचित राहणार नाही, शाळेची गुणवत्ता वाढवू आणि आपला परिसर शिक्षण क्षेत्रात आदर्श बनवू," असा संकल्प करण्याचे आवाहन करत समीरभाऊ भुजबळ यांनी सर्वांना नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.

Advertisement

Comments

No comments yet.