३ लाखात विकलेली नवरी शिर्डीत पळाली... वऱ्हाडींनी पाठलाग करून पकडल्यावर फुटले बिंग...

Share:
Main Image
Last updated: 15-Jun-2026

नाशिक, (प्रतिनिधी) १५ जून - नाशिक आणि सोलापूर जिल्ह्यात खळबळ उडवून देणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. घरभाड्यापोटी घेतलेल्या अवघ्या २५ हजार रुपयांच्या हातउसनवारीसाठी एका विवाहित आणि तीन मुलांच्या माता असलेल्या महिलेने लग्नाचा बनाव केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. एजंटांनी मिळून या असाह्य महिलेचे सोलापूरच्या एका तरुणासोबत लग्न लावून देत तब्बल ३ लाख रुपयांना तिची विक्री केली. मात्र, लग्नानंतर वाटेतच नवरीने धूम ठोकल्याने हा सर्व बनाव उघड झाला असून, याप्रकरणी वणी पोलीस ठाण्यात ठकबाजीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोलापूरच्या मोहोळ पोलिसांनी हा गुन्हा 'झिरो नंबर'ने नाशिकच्या वणी पोलिसांकडे वर्ग केला आहे.

बहिणीच्या मध्यस्थीने एजंटशी संपर्क

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल जयवंत धावणे (वय २४, रा. नरखेड, ता. मोहोळ, जि. सोलापूर) या शेती करणाऱ्या अविवाहित युवकाने याप्रकरणी फिर्याद दिली आहे. विशालच्या लग्नासाठी कुटुंबिय वधूचा शोध घेत असताना, त्यांच्या बहीण-मेव्हण्याच्या माध्यमातून बापू अंधारे (रा. मालेगाव, बार्शी) या एजंटशी संपर्क आला. अंधारे याने नाशिकमध्ये एक चांगली मुलगी असल्याचे सांगून धावणे कुटुंबाचा विश्वास संपादन केला. वधूच्या पालकांना अडीच लाख आणि स्वतःला ५० हजार रुपये लागतील, असा ३ लाखांचा व्यवहार ठरला.

गडगडावर लग्न आणि शिर्डीजवळ नवरी पळाली!

व्यवहार ठरल्यानंतर धावणे कुटुंब गेल्या शनिवारी (दि. ६) नाशिकला आले. पंचवटीतील एका लॉजवर मुक्काम ठोकल्यानंतर नाशिकच्या स्थानिक एजंटला बोलावण्यात आले. पैसे पदरात पाडून घेतल्यानंतर एजंटने धावणे कुटुंबाला कसबेवणी (ता. दिंडोरी) येथे नेले. तिथल्या सप्तशृंगी मंदिरात विशालचा विवाह त्या मुलीशी लावून देण्यात आला. विवाह आटोपून नववधूला सोबत घेऊन कुटुंब सोलापूरकडे रवाना झाले. मात्र, शिर्डीजवळ एका हॉटेलमध्ये चहापानासाठी थांबले असता नववधूने अचानक धूम ठोकली.

Advertisement

हॉटेलच्या पाठीमागे लपली होती 'ती'

नवरी गायब झाल्याचे लक्षात येताच वऱ्हाडी मंडळींची एकच पळापळ झाली. शोधमोहीम राबवून तिला हॉटेलच्या पाठीमागे असलेल्या एका खोलीत लपलेल्या अवस्थेत पकडण्यात आले. जेव्हा तिची कसून चौकशी करण्यात आली, तेव्हा तिने दिलेली कबुली ऐकून धावणे कुटुंबाच्या पायाखालची जमीनच सरकली.

...अशी रचली होती एजंटांनी स्क्रिप्ट!

संबंधित महिलेने कबुली दिली की, "मी विवाहित असून मला दोन मुले आणि एक मुलगी आहे. घरभाडे भरण्यासाठी मला पैशांची अत्यंत गरज होती. एजंटांपैकी एकाने मला २५ हजार रुपये दिले आणि त्याच्या सांगण्यावरून मी नवरी बनण्याचा बहाणा केला. 'विवाहानंतर वाटेत संधी मिळताच पळून जा, आम्ही पाठीमागून येऊन तुला सुरक्षित घरी आणू' अशी हमी एजंटांनी दिली होती, म्हणूनच मी लपून बसले होते."

नंबर प्लेट नसलेल्या कारने केला पाठलाग

फसवणूक झाल्याचे लक्षात येताच धावणे कुटुंबाने एजंट बापू अंधारे याच्याशी संपर्क साधून पैसे परत मागितले. अंधारे याने नाशिकच्या एजंटशी बोलणे करून दिले. नाशिकच्या एजंटने मुलगी परत आणल्यास पैसे देण्याचे मान्य केले. त्यानुसार धावणे कुटुंब दुसऱ्या दिवशी मुलीस घेऊन पुन्हा नाशिककडे निघाले. मात्र, कोपरगाव भागात नंबर प्लेट नसलेल्या एका संशयास्पद 'स्विफ्ट' कारने त्यांच्या वाहनाचा पाठलाग केला. घाबरलेल्या धावणे कुटुंबाने थेट मोहोळ (जि. सोलापूर) पोलीस ठाण्यात धाव घेतली. हा गुन्हा आता वणी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला असून, उपनिरीक्षक गणेश कुटे या आंतरजिल्हा एजंट रॅकेटचा पुढील तपास करत आहेत.

Advertisement

Comments

No comments yet.