नाशिक, (प्रतिनिधी) १३ जून - दैवी शक्तीची भीती दाखवून महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या आणि संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाच्या कायदेशीर लढाईत आता एक मोठी घडामोड घडली आहे. या हाय-प्रोफाईल खटल्यात सरकारची बाजू मांडण्यासाठी देशातील नामांकित कायदेतज्ज्ञ आणि ज्येष्ठ वकील ॲड. उज्ज्वल निकम यांची अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे. ॲड. निकम यांच्या या प्रकरणातील प्रवेशामुळे अशोक खरातशी संबंध असलेल्या राजकीय वर्तुळातील बड्या नेत्यांचे आणि मंत्रालयातील वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले असून, संशयितांचे धाबे दणाणले आहेत.
आधी गुंगीचे औषध, मग लैंगिक शोषण!
भोंदूबाबा अशोक खरात याने अध्यात्माच्या नावाखाली महिलांची मोठी फसवणूक केल्याचे तपासात समोर आले आहे. पीडित महिलांना दैवी शक्तीची भीती दाखवणे, गुंगीचे औषध देणे तसेच प्रसाद म्हणून दिल्या जाणाऱ्या पेढ्यातून किंवा पाण्यातून अंमली पदार्थ देऊन महिलांना विवश केले जात होते. यानंतर त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले जायचे. एका पीडित महिलेने हिमतीने पुढे येत तक्रार दाखल केल्यानंतर नाशिक पोलिसांनी खरात याला बेड्या ठोकल्या. या गुन्ह्याचे गांभीर्य आणि व्याप्ती लक्षात घेऊन याचा तपास विशेष तपास पथकाकडे (SIT) सोपवण्यात आला आहे.
एसआयटीच्या छाप्यात १०० अश्लील व्हिडिओ जप्त
'SIT'ने या प्रकरणाचा सखोल तपास करताना आरोपी अशोक खरात याच्या कार्यालय आणि फार्म हाऊसची कसून झडती घेतली. या कारवाईदरम्यान पोलिसांच्या हाती अत्यंत धक्कादायक आणि क्लेशदायक पुरावे लागले आहेत. महिलांचे लैंगिक शोषण करतानाचे तब्बल १०० हून अधिक अश्लील व्हिडिओ पोलिसांना मिळून आले आहेत. या व्हिडिओ क्लिप्सवरून खरातने अनेक महिलांना ब्लॅकमेल करून आपल्या जाळ्यात ओढल्याचे आणि त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त केल्याचे स्पष्ट झाले आहे.
खरातवर 'या' कडक कलमांनुसार गुन्हे दाखल:
भारतीय न्याय संहिता (BNS): लैंगिक अत्याचार, फसवणूक आणि जबरी गैरवर्तन.
विशेष कायदा: 'महाराष्ट्र नरबळी आणि जादूटोणा प्रतिबंधक कायदा' अंतर्गत गंभीर कलमे.
अंमली पदार्थ प्रतिबंधक: प्रसादातून अंमली पदार्थ दिल्याप्रकरणी इतर संबंधित कलमे.
बड्या धेंडांचे धाबे दणाणले!
अशोक खरात याचे अनेक बड्या राजकीय नेत्यांशी आणि मंत्रालयातील उच्चपदस्थ प्रशासकीय अधिकाऱ्यांशी जवळचे संबंध असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय व सामाजिक वर्तुळात रंगली आहे. अनेक राजकीय कार्यक्रमांत त्याचे व्हीआयपी वावर असल्याचेही बोलले जाते. मात्र, आता हा खटला थेट कायदेतज्ज्ञ ॲड. उज्ज्वल निकम यांच्याकडे सोपवण्यात आल्याने, या प्रकरणात कोणत्याही दबावाला थारा न देता कडक कायदेशीर कारवाई होणार हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे खरातला पाठीशी घालणाऱ्या पांढरपेशांची झोप उडाली आहे.