कुंभमेळ्यात यंदा ‘हेली-टुरिझम’ आणि ‘टेंट सिटी’ची धूम... जागतिक पर्यटकांना आकर्षित करण्याचे नियोजन...

Share:
Main Image
Last updated: 13-Jun-2026

मनोहर शिंदे, (नाशिक) १३ जून - नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, या सोहळ्याला जागतिक आध्यात्मिक आणि सांस्कृतिक पर्यटन केंद्र (Global Spiritual and Cultural Tourism Hub) म्हणून विकसित करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने कंबर कसली आहे. भाविक आणि आंतरराष्ट्रीय पर्यटकांना जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आज शिर्डी येथे केंद्रीय पर्यटन मंत्रालयाचे सचिव भुवनेश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय आढावा बैठक पार पडली. या बैठकीत कुंभमेळ्याची जागतिक स्तरावर प्रसिद्धी, टेंट सिटी, आणि पायाभूत सुविधांच्या नियोजनावर सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीत नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी सिंहस्थ २०२७ च्या तयारीचे सादरीकरण केले. यामध्ये विविध विभागांचा समन्वय आणि नियोजित पायाभूत सुविधांची माहिती देण्यात आली. तर नाशिक विभागीय आयुक्त तथा प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. प्रवीण गेडाम हे या बैठकीस दूरदृश्य प्रणालीद्वारे (व्हिडिओ कॉन्फरन्सिंग) उपस्थित होते.

'इन्क्रेडिबल इंडिया' अंतर्गत जागतिक ब्रँडिंग

कुंभमेळ्याला आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचवण्यासाठी केंद्र सरकारच्या 'इन्क्रेडिबल इंडिया' (अतुल्य भारत) मोहिमेचा प्रामुख्याने वापर केला जाणार आहे. देश-विदेशात या सोहळ्याची भव्य प्रसिद्धी केली जाईल. तसेच, पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी 'हेली-टुरिझम' (हेलिकॉप्टर पर्यटन) सारखे नावीन्यपूर्ण उपक्रम राबवण्यावर आणि प्रमुख पर्यटन स्थळांना जोडणारे 'पर्यटन सर्किट' तयार करण्यावर बैठकीत विशेष खल झाला.

Advertisement

'टेंट सिटी' आणि 'कलाग्राम'ची उभारणी
सिंहस्थ काळात येणाऱ्या कोट्यवधी भाविक आणि पर्यटकांच्या सोयीसाठी अत्याधुनिक 'टेंट सिटी' उभारण्यात येणार आहे. महाराष्ट्राची समृद्ध संस्कृती आणि स्थानिक कलागुणांना आंतरराष्ट्रीय व्यासपीठ मिळवून देण्यासाठी विशेष 'कलाग्राम' (कल्चरल हाट) विकसित केले जाईल. याशिवाय, कुंभमेळ्याचे महत्त्व समजून सांगण्यासाठी सांस्कृतिक केंद्रे, इंटरप्रिटेशन सेंटर आणि डिजिटल अनुभव केंद्रे उभारण्यात येणार आहेत.

बैठकीतील प्रमुख नियोजित सुविधा:
डिजिटल सेवा आणि बहुभाषिक मदत व्यवस्था: परदेशी पर्यटकांच्या सोयीसाठी विविध भाषांमध्ये माहिती देणारी डिजिटल मदत केंद्रे.
कौशल्य विकास: पर्यटन क्षेत्राशी संबंधित घटकांचे विशेष प्रशिक्षण आणि क्षमता वृद्धी (Capacity Building).
स्मार्ट मॅनेजमेंट: मागील कुंभमेळ्यांमधील यशस्वी उपक्रमांचा आणि व्यवस्थापनाचा अभ्यास करून त्याची अंमलबजावणी.

सुरक्षित आणि अविस्मरणीय कुंभमेळ्याचा संकल्प
"केंद्रीय पर्यटन मंत्रालय, महाराष्ट्र शासन, एमटीडीसी, पर्यटन संचालनालय आणि नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण यांच्या संयुक्त समन्वयातून सिंहस्थ कुंभमेळा २०२७ हा भाविकांसाठी सुरक्षित, सुलभ आणि आयुष्यभर स्मरणात राहील असा करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे."

वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती:
या महत्त्वपूर्ण बैठकीस श्री साईबाबा संस्थान ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक नीलेश गटणे, पर्यटन संचालनालयाचे संचालक मंगेश जोशी, एमटीडीसीचे महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल, प्रादेशिक व्यवस्थापक जगदीश चव्हाण, उपसंचालक नंदकुमार राऊत आणि साईबाबा संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांच्यासह केंद्राचे व राज्याचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Advertisement

Comments

No comments yet.