दीपकनाथ गांगुर्डे, (नाशिक) १३ जून - नागरिकांची कामे जलद गतीने व्हावीत आणि प्रशासकीय कामात सुटसुटीतपणा यावा, या दृष्टीने भूमी अभिलेख विभागाने नाशिक विभागात महत्त्वाचे फेरबदल केले आहेत. नाशिक विभागात जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख यांची दोन नवीन कार्यालये आणि नगर भूमापन अधिकाऱ्यांच्या एका नवीन कार्यालयाला मान्यता देण्यात आली आहे. या सर्व कार्यालयांचे नवीन कार्यक्षेत्रही निश्चित करण्यात आले असल्याची माहिती भूमी अभिलेख विभागाचे उपसंचालक महेश इंगळे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे. या नवीन रचनेमुळे आता अहिल्यानगर (अहमदनगर) आणि नाशिक जिल्ह्याचे विभाजन करून प्रत्येकी दोन जिल्हा अधीक्षक कार्यालये कार्यरत होणार आहेत.
असे असेल नवीन कार्यालयांचे कार्यक्षेत्र:
१. अहिल्यानगर जिल्हा:
जिल्हा अधीक्षक (क्रमांक १) - मुख्यालय: अहिल्यानगर
कार्यक्षेत्र: अहिल्यानगर, नेवासा, शेवगाव, पाथर्डी, जामखेड, कर्जत, श्रीगोंदा आणि पारनेर.
जिल्हा अधीक्षक (क्रमांक २) - मुख्यालय: शिर्डी
कार्यक्षेत्र: राहुरी, संगमनेर, अकोले, कोपरगाव, श्रीरामपूर आणि राहाता.
२. नाशिक जिल्हा:
जिल्हा अधीक्षक (क्रमांक १) - मुख्यालय: नाशिक
कार्यक्षेत्र: नाशिक, दिंडोरी, पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, निफाड, सिन्नर या तालुक्यांसह नगर भूमापन अधिकारी कार्यालय क्र. १ व २ आणि विशेष उप अधीक्षक कार्यालये.
जिल्हा अधीक्षक (क्रमांक २) - मुख्यालय: मालेगाव
कार्यक्षेत्र: कळवण, देवळा, चांदवड, बागलाण, नांदगाव, येवला, मालेगाव तालुका आणि नगर भूमापन अधिकारी (मालेगाव).
नाशिक शहरातील नगर भूमापन (City Survey) कार्यालयांची पुनर्रचना:
नाशिक शहरातील वाढती लोकसंख्या आणि शहरीकरण लक्षात घेता, नगर भूमापन अधिकारी क्रमांक १ आणि २ च्या कार्यक्षेत्रातील महसुली गावांची विभागणी खालीलप्रमाणे करण्यात आली आहे:
नगर भूमापन अधिकारी (क्र. १) नाशिक:
अंतर्गत गावे: म्हसरुळ, आडगाव, नाशिक शहर-१, २, ४, नांदूर दसक, मानूर, पंचक, दसक, आगर टाकळी, देवळाली+भगूर, वडनेर दुमाला, विहितगाव, वडाळा, चेहेडी, चाडेगाव आणि पिंपळगाव (खांब).
नगर भूमापन अधिकारी (क्र. २) नाशिक:
अंतर्गत गावे: मखमलाबाद, गंगापूर, आनंदवल्ली, पिंपळगाव (बहुला), सातपूर, कामटवाडे, चुंचाळे, अंबड खुर्द, पाथर्डी, दाढेगाव, नाशिक शहर-३, आणि नव्याने परिरक्षणासाठी (Maintenance) येणारी सजा 'नाशिक शहर-५'.
निर्णयाचा फायदा: या नवीन प्रशासकीय रचनेमुळे शिर्डी आणि मालेगाव परिसरातील नागरिकांना जिल्हा पातळीवरील कामांसाठी मुख्य मुख्यालयात जाण्याची गरज पडणार नाही. तसेच नाशिक शहरातील जमिनींचे मोजणी, फेरफार आणि नगर भूमापनाची कामे अधिक गतीने होतील.