नाशिक, (प्रतिनिधी) १२ जून - सातपूर औद्योगिक वसाहतीतील दुकान फोडून चोरी करणाऱ्या दोन सराईत चोरट्यांच्या एमआयडीसी पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. पोलिसांनी रेडक्रॉस भागात सापळा लावून या दुकलीला बेड्या ठोकल्या. त्यांच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेली ऑटो रिक्षा आणि चोरीचा ऐवज असा एकूण २ लाख ७ हजार ८८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अली मेहबुब शेख (वय २७, रा. किस्मतबाग, शालीमार, नाशिक) आणि सोहेल मोहिद्दीन शेख (वय ३१, रा. जैनमंदिर, म्हसोबावाडी, भद्रकाली, नाशिक) अशी अटक करण्यात आलेल्या संशयित चोरट्यांची नावे आहेत.
खबऱ्याची माहिती अन् पोलिसांचा सापळा
औद्योगिक वसाहतीतील एक दुकान चोरट्यांनी शटर उचकटून फोडले होते. या घरफोडीप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करत असताना एमआयडीसी पोलिसांचे गुन्हे शोध पथक (DB Team) चोरट्यांचा माग काढत होते.
तपास सुरू असतानाच, पोलीस पथकाला खबऱ्याकडून अत्यंत महत्त्वाची माहिती मिळाली की, सदर घरफोडी करणारे संशयित एका ऑटो रिक्षामधून रेडक्रॉस परिसरात येणार आहेत. माहिती मिळताच गुन्हे शोध पथकाने रेडक्रॉस भागात तातडीने धाव घेत दबा धरून सापळा रचला. संशयित रिक्षासह येताच पोलिसांनी झडप घालून दोघांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी संशयितांना तात्काळ बेड्या ठोकून गुन्ह्यात वापरलेली रिक्षा आणि चोरीचा माल जप्त केला.
या पथकाने केली कारवाई
ही यशस्वी कारवाई एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरुटे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संदीप शेवाळे, हवालदार सोमनाथ झोले, तुकाराम शेळके, सुभाष जाधव तसेच पोलीस अंमलदार जनार्दन ढाकणे, अर्जुन कांदळकर, श्रीहरी बिराजदार, संदीप खैरनार, आवेज शेख, जितेंद्र शिंदे, योगेश जाधव, विजय सोनवणे, प्रशांत नागरे, दीपक जगताप आणि किरण सोनवणे आदींच्या पथकाने केली आहे. पोलीस आता या संशयितांकडून इतर काही गुन्हे उघडकीस येतात का, यादृष्टीने पुढील तपास करत आहेत.