एस.के. खेडकर, (नाशिक) १२ जून - नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे पुढील वर्षी (२०२७) होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तयारीचा वेग वाढवला आहे. कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या कोट्यवधी भाविकांच्या सोयीसाठी गोदावरी आणि इतर नदीकाठांवर बांधण्यात येत असलेल्या नवीन घाटांची कामे कोणत्याही परिस्थितीत जानेवारी २०२७ अखेर पूर्ण करावीत, असे कडक निर्देश जिल्ह्याचे पालक सचिव तथा जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी आज येथे दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात आज सकाळी पालक सचिव एकनाथ डवले यांच्या अध्यक्षतेखाली सिंहस्थ कुंभमेळा विकास कामांची महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. या बैठकीत पोलीस, महापालिका, जलसंपदा आणि जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
अधिकाऱ्यांनो, एसी केबिन सोडा; क्षेत्रीय भेटी द्या!
बैठकीत बोलताना पालक सचिव श्री. डवले म्हणाले की, सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी राज्य शासनाने मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला आहे. आता सोहळा अगदी जवळ आला असल्याने विविध विभागांनी आपल्या कामांचा वेग वाढवणे गरजेचे आहे. केवळ कागदावर नियोजन न करता अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन (क्षेत्रीय भेटी) कामांची पाहणी करावी. तसेच, रस्त्यांची कामे पावसाळ्यापूर्वी आणि दिलेल्या मुदतीत कशी पूर्ण होतील, याचे चोख नियोजन करावे.
'या' प्रमुख प्रकल्पांना गती देण्याचे आदेश:
बैठकीत प्रामुख्याने खालील महत्त्वाच्या प्रकल्पांच्या सद्यस्थितीवर चर्चा करण्यात आली आणि त्यांना गती देण्याचे आदेश देण्यात आले:
साधूग्राम: साधू-महंतांच्या वास्तव्यासाठी उभारण्यात येणाऱ्या साधूग्रामच्या कामांचा वेग वाढवणे.
नाशिक परिक्रमा मार्ग व रामकाल पथ: भाविकांच्या सोयीसाठी अंतर्गत जोडणी रस्ते वेळेत पूर्ण करणे.
त्र्यंबकेश्वर दर्शन पथ: त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी येणाऱ्या रांगांचे व्यवस्थापन आणि दर्शन पथ सुलभ करणे.
ओझर विमानतळ विस्तारीकरण: देश-विदेशातील पर्यटकांसाठी विमानतळ पायाभूत सुविधांचे काम तातडीने मार्गी लावणे.
द्वारका सर्कल: नाशिकमधील वाहतुकीचा मुख्य कणा असलेल्या द्वारका सर्कलच्या वाहतूक नियोजनावर भर देणे.
भूसंपादन आणि पोलीस प्रशासनाची सज्जता
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी नाशिक परिक्रमा मार्गासाठी सुरू असलेल्या भूसंपादनाच्या प्रक्रियेबाबत बैठकीत सविस्तर माहिती दिली. तर, विशेष पोलीस महानिरीक्षक संजय ऐनपुरे आणि पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी कुंभमेळ्यादरम्यान कायदा, सुव्यवस्था आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आवश्यक असणाऱ्या उपाययोजनांबाबत महत्वपूर्ण सूचना मांडल्या.
महापालिका आयुक्त मनीषा खत्री, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता राजेश गोवर्धने आणि एमएसआयडीसीचे कार्यकारी अभियंता संदीप पठारे यांनी आपापल्या विभागामार्फत सुरू असलेल्या कामांच्या प्रगतीचा अहवाल सादर केला.
लवकरच घेणार पुढील आढावा
"सिंहस्थ कुंभमेळा हा जागतिक स्तरावरील सोहळा असल्याने कामात कोणतीही दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही. सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवून काम करावे, या सर्व कामांचा मी स्वतः लवकरच पुन्हा आढावा घेईन."
— एकनाथ डवले, पालक सचिव, नाशिक.
बैठकीस उपस्थित मान्यवर:
या बैठकीला पोलीस अधीक्षक डॉ. स्वामी, उपवनसंरक्षक सिद्धेश सावर्डेकर, राकेश सेपट, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रतिभा संगमनेरे, कुंभमेळा प्राधिकरणाचे उपायुक्त (नियोजन) योगेंद्र चौधरी यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.