नाशिक पोलिसांना ३ वर्षांपासून गुंगारा देणारा जेरबंद... या गुन्ह्यांची उकल...

Share:
Main Image
Last updated: 12-Jun-2026

नाशिक, (प्रतिनिधी) १२ जून - गेल्या तीन वर्षांपासून पोलिसांना चकवा देत फरार असलेल्या एका सराईत चोरट्याला जेरबंद करण्यात शहर गुन्हे शाखेच्या युनिट २ च्या पथकाला अखेर यश आले आहे. संशयिताला नांदूरनाका परिसरातून सापळा रचून अटक करण्यात आली असून, त्याच्या अटकेमुळे गंगापूर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या दोन गंभीर घरफोडीच्या गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे. अफजल हुसैन सय्यद (वय ३१, रा. भगूर, ता. जि. नाशिक) असे अटक करण्यात आलेल्या संशयित चोरट्याचे नाव आहे.

नांदूरनाका भागात लावला सापळा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित अफजल सय्यद याच्याविरोधात गंगापूर पोलीस ठाण्यात घरफोडीचे दोन वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. गुन्हे दाखल झाल्यापासून म्हणजेच गेल्या तीन वर्षांपासून तो पोलिसांच्या हाती लागत नव्हता आणि सातत्याने आपली ठिकाणे बदलून पोलिसांना गुंगारा देत होता.

Advertisement

गुन्हे शाखेचे युनिट २ चे पथक त्याचा माग काढत असतानाच, पथकातील कर्मचारी मनोहर शिंदे आणि चंद्रकांत गवळी यांना त्यांच्या खबऱ्यामार्फत अत्यंत महत्त्वाची माहिती मिळाली. संशयित अफजल सय्यद हा आडगाव शिवारातील नांदूरनाका भागात वावरत असल्याची पक्की माहिती पोलिसांना मिळाली होती. माहिती मिळताच युनिट २ च्या पथकाने नांदूरनाका परिसरात तातडीने धाव घेत गुप्तपणे सापळा रचला. संशयित परिसरात येताच पोलिसांनी झडप घालून त्याच्या मुसक्या आवळल्या.

 साथीदारांसह गुन्ह्याची दिली कबुली

पोलिसांनी संशयित अफजल सय्यद याला ताब्यात घेऊन खाक्या दाखवताच त्याने आपल्या अन्य साथीदारांच्या मदतीने गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी केल्याची कबुली दिली. युनिट २ च्या पथकाने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून पुढील तपासासाठी आणि अटकेच्या कारवाईसाठी आरोपीला गंगापूर पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. या टोळीने शहरात आणखी काही ठिकाणी घरफोड्या केल्या आहेत का, यादृष्टीने गंगापूर पोलीस आता अधिक तपास करत आहेत.

ही यशस्वी कारवाई गुन्हे शाखा युनिट २ चे प्रभारी हेमंत तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक यशवंत बेंडकोळी, जमादार मनोहर शिंदे, हवालदार नंदकुमार नांदुर्डीकर, चंद्रकांत गवळी तसेच अंमलदार महेश खांडबहाले आणि तेजस मते आदींच्या पथकाने केली आहे.

Advertisement

Comments

No comments yet.