भरधाव पिकअपच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण ठार... दोघे गंभीर जखमी...

Share:
Main Image
Last updated: 11-Jun-2026

पेठ, (प्रतिनिधी) ११ जून - ननाशी-बाऱ्हे मार्गावरील सावरपाडा शिवारात बुधवारी (दि. १०) सकाळी एक अत्यंत दुर्दैवी आणि भीषण अपघात घडला. भरधाव जाणाऱ्या एका मालवाहू पिकअपने दुचाकीला दिलेल्या भीषण धडकेत २१ वर्षीय दुचाकीस्वार तरुण जागीच ठार झाला. तर, याच दुचाकीवर ट्रिपलसीट प्रवास करणारे त्याचे इतर दोन मित्र गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पेठ पोलीस ठाण्यात पिकअप चालकाविरोधात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 कामासाठी घराबाहेर पडले अन् काळाचा घाला आला!

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुषार लहू तुंगार (वय २१) असे अपघातात मृत्यू झालेल्या दुर्दैवी तरुण दुचाकीस्वाराचे नाव आहे. तर नरेंद्र भीमराव जांबर व हिरामण विश्वास झिरवाळ (सर्व रा. टेटमाळ - गांडोळे, ता. दिंडोरी) अशी जखमी झालेल्या दोघांची नावे आहेत.

Advertisement

टेटमाळ येथील हे तिघे मित्र बुधवारी सकाळी नेहमीप्रमाणे कामधंद्यानिमित्त घराबाहेर पडले होते. ननाशी-बाऱ्हे मार्गावरून ते आपल्या एमएच १५ केपी ५५२७ क्रमांकाच्या दुचाकीने जात होते. सावरपाडा शिवारातील राऊतमळा फाटा भागाजवळ आले असता, ननाशीकडून अत्यंत भरधाव वेगाने येणाऱ्या एमएच १५ जीव्ही ८९२६ क्रमांकाच्या मालवाहू पिकअपने त्यांच्या दुचाकीला समोरासमोर जोरदार धडक दिली.

एकाचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर

हा अपघात इतका भीषण होता की, दुचाकी चालवणारा तुषार तुंगार हा तरुण गंभीर मार लागल्याने जागीच ठार झाला. तर त्याचे दोन्ही मित्र रस्त्यावर फेकले गेल्याने गंभीर जखमी झाले. अपघात होताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलवले.

या अपघाताबाबत मृत तुषारचे वडील लहू काशिनाथ तुंगार यांनी पेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पिकअप चालक अतुल छगन हिंडे (रा. वाघनखी, ता. सुरगाणा) याच्याविरोधात बेजबाबदारपणे वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पेठ पोलीस ठाण्याचे हवालदार एम. पी. मौळे करत आहेत.

Advertisement

Comments

No comments yet.