नाशिक, (प्रतिनिधी) १० जून - महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक प्राधिकरण मतदारसंघाच्या द्वैवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. निवडणूक प्रक्रिया खुल्या, मुक्त आणि शांततापूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी मतदान आणि मतमोजणीच्या दिवशी जिल्ह्यातील सर्व प्रकारची देशी-विदेशी मद्यविक्री बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी जारी केले आहेत.
कधी आणि किती वेळ असेल बंदी? (ड्राय डे शेड्युल)
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५१ आणि महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत जिल्हाधिकाऱ्यांनी खालील कालावधीत 'ड्राय डे' घोषित केला आहे:
१६ जून २०२६: मतदानाच्या ४८ तास आधी, म्हणजेच सायंकाळी ४ वाजल्यापासून मद्यविक्री बंद होईल.
१७ जून २०२६: मतदानाचा आदला दिवस (संपूर्ण दिवस बंद).
१८ जून २०२६: मतदानाचा मुख्य दिवस (मतदान प्रक्रिया संपेपर्यंत बंद).
२२ जून २०२६: मतमोजणीचा दिवस (मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत बंद).
या परवान्यांचा (Licenses) समावेश
या आदेशानुसार नाशिक जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या देशी व विदेशी मद्यविक्रीच्या अनुज्ञप्त्या (जसे की हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, वाईन्स शॉप्स, बिअर बार आणि परमिट रूम्स - FL-I, FL-II, FL-III, CL-III इत्यादी) पूर्णपणे बंद राहतील.
आदेश डावलल्यास कठोर कारवाई!
"नाशिक स्थानिक प्राधिकरण मतदारसंघासाठी गुरुवार, १८ जून रोजी मतदान आणि सोमवार, २२ जून रोजी मतमोजणी होणार आहे. या काळात सर्व अबकारी अनुज्ञप्तीधारकांनी आदेशाचे काटेकोर पालन करावे. अंमलबजावणीत कसूर केल्यास महाराष्ट्र दारूबंदी कायद्यातील कलम ५४ व ५८ नुसार परवाना रद्द करण्यासह कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल."
— आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, नाशिक