मंदिरांमधील दानपेट्या फोडणारा चोरटा जेरबंद... सातपूर पोलिसांची धडक कारवाई...

Share:
Main Image
Last updated: 10-Jun-2026

नाशिक, (प्रतिनिधी) १० जून - सातपूर औद्योगिक वसाहतीमधील मंदिरांमध्ये शिरून दानपेट्या फोडणाऱ्या टोळीतील एका मुख्य चोरट्याला सातपूर पोलिसांनी अत्यंत शिताफीने अटक केली आहे. श्रमिकनगर येथील जय गणेश कॉलनी भागात ही कारवाई करण्यात आली. संशयिताने आपल्या अन्य साथीदारांच्या मदतीने दोन मंदिरांमध्ये चोऱ्या केल्याची कबुली दिली असून, त्याच्या ताब्यातून २१ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

अशोकनगरचा संशयित गजाआड

रितेश भगवान सुबर (वय १९, रा. काकड मळा, अशोकनगर, सातपूर) असे अटक करण्यात आलेल्या संशयित चोरट्याचे नाव आहे. त्याचे अन्य साथीदारही पोलिसांच्या रडारवर आहेत.

सीसीटीव्ही फुटेज ठरले महत्त्वाचे

Advertisement

गेल्या सोमवारी (दि. १) श्रमिकनगर भागातील द्वारकाधीश पाताळ गुफा येथील श्रीकृष्ण मंदिरात धाडसी चोरी झाली होती. चोरट्यांनी मंदिराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि दानपेटीतील रोकडसह चांदीचे दागिने आणि तीन मोबाईल असा मुद्देमाल लंपास केला होता. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची कसून तपासणी केली असता, या चोरीत तीन जण सामील असल्याचे निष्पन्न झाले.

गुन्हे शाखेने आवळल्या दुसऱ्या साथीदाराच्या मुसक्या:

सातपूर पोलिसांनी रितेश सुबर याला जय गणेश कॉलनी परिसरातून ताब्यात घेतले. दरम्यान, या गुन्ह्यातील त्याच्या एका साथीदाराला शहर गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या पथकाने दुसऱ्या एका गुन्ह्यात आधीच बेड्या ठोकल्या आहेत.

पोलीस पथकाची कामगिरी

ही कारवाई सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार अनिल आहेर, हवालदार दीपक खरपडे, तुषार देसले, अंमलदार सागर गुंजाळ, रवींद्र जाधव, सचिन आजबे, सोनू खाडे, पारस देशमुख आणि संजय दराडे आदींच्या पथकाने केली. पोलीस आता या टोळीने शहरात आणखी कुठे चोऱ्या केल्या आहेत का, याचा तपास करत आहेत.

Advertisement

Comments

No comments yet.