गोदाघाटासह उंटवाडीतील मंदिरे लुटणारा जेरबंद... चिल्लरच्या बदल्यात नोटा घेताना लागला पोलिसांच्या हाती...

Share:
Main Image
Last updated: 09-Jun-2026

नाशिक, (प्रतिनिधी) ९ जून - गोदाघाटासह उंटवाडी परिसरातील विविध मंदिरांमधील दानपेट्या फोडून धुमाकूळ घालणाऱ्या एका सराईत चोरट्याला जेरबंद करण्यात शहर गुन्हे शाखेच्या युनिट-१ पथकाला मोठे यश आले आहे. मंदिरांतून चोरलेली मोठ्या प्रमाणातील सुटी नाणी (चिल्लर) देऊन त्याबदल्यात नोटा मिळविण्याच्या नादात हा चोरटा पोलिसांच्या जाळ्यात अडकला. त्याच्या ताब्यातून चोरीत वापरलेली दुचाकी आणि रोकड असा सुमारे १ लाख ५५ हजार ७२० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. शुभम उद्धव मगर (वय २०, रा. नागरे मळा, अशोकनगर, सातपूर) असे अटक करण्यात आलेल्या संशयित चोरट्याचे नाव आहे. या गुन्ह्यात त्याला साथ देणारे त्याचे तीन साथीदार प्रणव उर्फ छोट्या जगताप, रितेश सुबर आणि बबुआ अन्सारी (सर्व रा. अशोकनगर, सातपूर) हे फरार असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत.

गौरी पटांगणावर पोलिसांनी लावला सापळा

गुन्हे शाखा युनिट-१ चे हवालदार नाझिमखान पठाण व संदीप भांड यांना एक अत्यंत खात्रीशीर माहिती मिळाली होती. पंचवटी अमरधामकडून एक दुचाकीस्वार तरुण मंदिरांतील दानपेट्यांमधून चोरलेली चिल्लर बदलून नोटा मिळविण्यासाठी गौरी पटांगणाच्या दिशेने जात असल्याची माहिती मिळताच, पोलिसांनी रविवारी (दि. ७) या मार्गावर तात्काळ सापळा रचला.

संशयित शुभम मगर हा पांढऱ्या रंगाच्या पल्सर दुचाकीवरून येताच पोलिसांनी त्याची वाट अडवून त्याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्या पाठीवर असलेल्या सॅक (सॅग) मध्ये मोठ्या प्रमाणावर चिल्लर आणि रोकड आढळून आली.

Advertisement

'या' मंदिरांतील दानपेट्या फोडल्याची कबुली

पोलिसी खाक्या दाखवताच संशयित शुभमने आपल्या इतर तीन साथीदारांच्या मदतीने गोदाघाटावरील प्रसिद्ध सांडवा देवी मंदिर, भैरवनाथ मंदिर तसेच उंटवाडी येथील सिटी सेंटर मॉलच्या पाठीमागे असलेल्या मंदिरातील दानपेट्या फोडल्याची कबुली दिली. पोलीस पडताळणीत या चोऱ्यांबाबत पंचवटी आणि गंगापूर पोलीस ठाण्यात आधीच गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे. या टोळीचे उर्वरित साथीदार हाती लागताच शहरातील आणखी काही देवस्थानांमधील चोऱ्यांचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलीस सूत्रांनी वर्तविली आहे.

या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली झाली कारवाई:

ही धडक कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहाय्यक आयुक्त संदीप मिटके व वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, हवालदार प्रवीण वाघमारे, संदीप भांड, नाझिमखान पठाण, मिलिंदसिंग परदेशी, प्रशांत मरकड, विशाल काठे, रोहिदास लिळके, योगीराज गायकवाड, अंमलदार मुक्तार शेख, अमोल कोष्टी, शर्मिला कोकणी, मनिषा सरोदे व अनुजा येलवे आदींच्या पथकाने केली.

Advertisement

Comments

No comments yet.