सकाळी गोदाघाटावरून दुचाकी पळवली... रात्री पेठरोडवर पोलिसांनी पाठलाग करून आवळल्या मुसक्या...

Share:
Main Image
Last updated: 08-Jun-2026

नाशिक, (प्रतिनिधी) ८ जून - गोदाघाटावरून दुचाकी चोरी करून पळ काढणाऱ्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दोन सराईत चोरांना पंचवटी पोलिसांच्या गस्ती पथकाने अत्यंत थरारक पाठलाग करून बेड्या ठोकल्या आहेत. संशयितांच्या ताब्यातून सुमारे दीड लाख रुपये किमतीच्या चोरलेल्या तीन मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत. या कारवाईमुळे पंचवटी आणि उपनगर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत दाखल असलेले दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. विलास गोकुळ राठोड (वय २३, रा. भारंबा तांडा, ता. कन्नड) व रवींद्र नामदेव गंगावणे (वय ५०, रा. आंबेडकरनगर, साखर कारखाना गौतमनगर, ता. कन्नड, जि. छत्रपती संभाजीनगर) अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत.

अशी झाली थरारक कारवाई...

रविवार, ७ जून रोजी सकाळच्या सुमारास गोदाघाटावरून चोरट्यांनी एक अ‍ॅक्टिव्हा दुचाकी (क्रमांक MH 15 DX 1888) पळवून नेली होती. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस चोरट्यांचा माग काढत होते. रविवारी रात्रीच्या वेळी पंचवटी पोलिसांचे गस्ती पथक पेठरोड परिसरात गस्त घालत असताना, त्यांना एका दुचाकीवरून दोन संशयित भरधाव वेगात जाताना दिसले. त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने गस्त पथकाने तात्काळ पोलीस ठाण्याशी संपर्क साधून सकाळी चोरीला गेलेल्या अ‍ॅक्टिव्हाचा नंबर आणि वर्णनाची खात्री करून घेतली. संशयित तीच चोरीची दुचाकी घेऊन पळत असल्याचे स्पष्ट होताच पोलिसांनी पेठरोड जवळील पाटाच्या रस्त्याने त्यांचा थरारक पाठलाग सुरू केला आणि काही अंतरावरच दोघांच्या मुसक्या आवळल्या.

Advertisement

हमालवाडीत लपवल्या होत्या दुचाकी; आणखी गुन्हे उघड होणार?

पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेऊन खाक्या दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. तसेच ही दुचाकी आणि इतर दोन ठिकाणांवरून चोरलेल्या मोटारसायकली त्यांनी पंचवटीतील हमालवाडी भागात लपवून ठेवल्याचे सांगितले. पोलिसांनी हमालवाडीतून दीड लाख रुपये किमतीच्या एकूण तीन मोटारसायकली जप्त केल्या आहेत. या दोन्ही चोरट्यांनी नाशिक शहरात आणखी कुठे हात साफ केला आहे का? याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.

या पथकाने केली कामगिरी:

ही धडक कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील व सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक सतीश शिरसाठ, हवालदार शिंदे, महेश नांदुर्डीकर, लोणारे, वायकंडे, अंमलदार चितळकर, पवार, पाटील, देशमुख व भोईर आदींच्या पथकाने केली.

Advertisement

Comments

No comments yet.