महागाईचा भडका... घरगुती एलपीजी सिलेंडर महागला... असे आहेत नवे दर...

Share:
Main Image
Last updated: 07-Jun-2026

मुंबई, (प्रतिनिधी) ७ जून - महागाईच्या झळा सहन करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना आणि गृहिणींना आणखी एक मोठा धक्का बसला आहे. सरकारी तेल कंपन्यांनी १४.२ किलोच्या घरगुती एलपीजी (LPG) गॅस सिलेंडरच्या किमतीत २९ रुपयांची वाढ जाहीर केली आहे. या नव्या दरवाढीची अंमलबजावणी तत्काळ प्रभावाने करण्यात आल्यामुळे आता स्वयंपाकघराचा मासिक खर्च वाढणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून पेट्रोल, डिझेल, सीएनजी आणि दैनंदिन गरजेच्या वस्तूंच्या किमती सातत्याने वाढत आहेत. अशातच आता घरगुती गॅसही महागल्याने मध्यमवर्गीय आणि कमी उत्पन्न गटातील कुटुंबांचे आर्थिक गणित कोलमडणार आहे. यापूर्वी मे आणि जून महिन्याच्या सुरुवातीला व्यावसायिक (कमर्शियल) वापराच्या सिलेंडरच्या दरातही मोठी वाढ करण्यात आली होती.

प्रमुख महानगरांमध्ये आता 'हे' असतील नवे दर:

या दरवाढीनंतर देशातील प्रमुख शहरांमध्ये घरगुती गॅस सिलेंडरचे दर नव्या पातळीवर पोहोचले आहेत:

मुंबई आणि पुणे: ₹९४१.५०

दिल्ली: ₹९४२.००

कोलकाता: ₹९६८.००

Advertisement

चेन्नई: ₹९५७.५०

जागतिक तणावाचा फटका; पण तुटवडा नाही

इराणमधील संघर्ष, होर्मुझ सामुद्रधुनीशी संबंधित जागतिक तणाव आणि जागतिक ऊर्जा पुरवठा साखळीवरील दबावामुळे पेट्रोलियम उत्पादनांच्या किमती वाढण्याची शक्यता आधीच व्यक्त केली जात होती. मात्र, या संकटाच्या काळातही देशात एलपीजीचा पुरवठा सुरळीत सुरू असल्याचा दावा केंद्र सरकारने केला आहे.

पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने जारी केलेल्या माहितीनुसार, देशभरात गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध असून कोणत्याही भागात तुटवडा निर्माण झालेला नाही. देशातील रिफायनऱ्या सध्या पूर्ण क्षमतेने काम करत असून साठेबाजी आणि काळाबाजार रोखण्यासाठी कडक कारवाई सुरू आहे.

९९ टक्के गॅस बुकिंग आता ऑनलाईन

गॅस वितरण व्यवस्थेत पारदर्शकता आणण्यासाठी केंद्र सरकारने ऑनलाईन बुकिंगला मोठे प्रोत्साहन दिले आहे. सध्या देशातील जवळपास ९९ टक्के गॅस बुकिंग ऑनलाईन पद्धतीने होत असून, ९५ टक्के वितरण हे ग्राहकांच्या मोबाईलवर पाठविल्या जाणाऱ्या ऑथेंटिकेशन कोडच्या (OTP) आधारेच सुरक्षितपणे केले जात असल्याची माहिती मंत्रालयाने दिली आहे. तरीही, ऐन पावसाळ्याच्या तोंडावर झालेल्या या दरवाढीमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

Advertisement

Comments

No comments yet.