मुंबई/नाशिक, (प्रतिनिधी) ६ जून - नाफेड आणि एनसीसीएफने कांदा खरेदी कृषि उत्पन्न बाजार समित्यांमध्ये प्रत्यक्ष शेतकऱ्यांकडून करावी. केंद्र शासनाने मंजुरी दिलेले खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सर्व संस्थांनी खरेदी प्रक्रियेला गती देऊन ३० जून २०२६ पर्यंत लक्ष्य पूर्ण करावे अशा सूचना राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्यासह सबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच आवश्यकता असेल तर कांद्याचा लक्षांक वाढवून मिळण्यासाठी आपण केंद्र शासनाकडे प्रयत्न करू असेही मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले. पीएसएफ कांदा अभियान २०२६-२७ अंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफ कडून बाजार समित्यांमध्ये कांदा खरेदी करण्यासाठी नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे सभापती,सचिव आणि अधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित करण्यात आलेली होती. या बैठकीमध्ये व्हिसीद्वारे सहभागी होऊन मंत्री छगन भुजबळ यांनी सूचना केल्या. या बैठकीमध्ये जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा उपनिबंधक संदीप जाधव त्याचप्रमाणे नाफेड आणि एनसीसीएफचे अधिकारी उपस्थित होते. तर या बैठकीस व्हिसीद्वारे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासह जिल्ह्यातील अनेक लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, केंद्रीय गृहमंत्री माननीय अमित शहा यांनी दिल्लीमध्ये कांदा प्रश्नावर घेतलेल्या बैठकीमध्ये आम्ही कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी मांडल्या. त्यानुसार केंद्र शासनाने किंमत स्थिरता निधी योजनेंतर्गत ग्राहक संरक्षण, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयामार्फत नाफेड व एनसीसीएफ या संस्थांच्या माध्यमातून कांदा खरेदी बाबत अनेक निकष शिथिल केले आहे. त्याचप्रमाणे नाफेड आणि एनसीसीएफने कांदा खरेदी कृषि उत्पन्न बाजार समित्यांमधून करण्यासाठी सुद्धा मान्यता दिली आहे.त्यानुसार राज्य शासनाच्या पणन विभागाने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात करण्यात येणाऱ्या खरेदीवर आकारण्यात येणाऱ्या शुल्कातून म्हणजे बाजार फी मधून सूट दिली आहे. त्यामुळे नाफेड आणि एनसीसीएफने कांदा खरेदी कृषि उत्पन्न बाजार समित्यांमध्ये प्रत्यक्ष शेतकऱ्यांकडून करावी अशा सूचना मंत्री छगन भुजबळ यांनी केल्या.
मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, नाफेड आणि एनसीसीएफच्या माध्यमातून कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी प्रत्यक्ष शेतकऱ्यांकडून तातडीने कांदा खरेदी (Procurement) केंद्र सुरू करावे. कांदा खरेदी केंद्रावर कांदा ग्रेडिंग व सॉर्टिंग मशीनाचा वापर करण्याच्या संबंधितांना सूचना देण्यात याव्या. १ जून २०२६ पर्यंत केवळ १५.५० क्विंटल (१.५५ मेट्रिक टन) कांदा खरेदी करण्यात आला असून लक्ष्य २.०० लाख मेट्रिक टन होते. अवकाळी पावसामुळे चांगल्या दर्जाच्या साठ्यातही ग्रेड-ए दर्जाखालील कांद्यांचे प्रमाण वाढल्याचे आढळले. त्यामुळे खरेदी प्रक्रियेत अडथळे निर्माण होत आहेत.
म्हणून केंद्र शासनाने ग्रेड एक कांद्याच्या निकषांमध्ये शिथिलता दिलेली आहे. त्यामुळे सीडब्ल्यूसी आणि निरीक्षण संस्थांकडून गुणवत्ता तपासणी प्रक्रियेमध्ये नकारात्मक छाननी (Rejection) करू नये अशा सूचना मंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या.
तसेच आवश्यकता असेल तर कांद्याचा लक्षांक वाढवून मिळण्यासाठी आपण केंद्र शासनाकडे प्रयत्न करू मात्र केंद्र शासनाने मंजुरी दिलेले खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सर्व संस्थांनी खरेदी प्रक्रियेला गती देऊन ३० जून २०२६ पर्यंत लक्ष्य पूर्ण करावे असे आदेश मंत्री छगन भुजबळ यांनी संबंधित यंत्रणांना दिले.