नाशिक, (प्रतिनिधी) ५ जून - सातपूर परिसरात सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झालेल्या एका 'गोल्डमॅन'ला चाकूचा धाक दाखवून मारहाण करत लुटणाऱ्या टोळीचा नाशिक पोलिसांनी अखेर पर्दाफाश केला आहे. शहर गुन्हे शाखेच्या युनिट-२ चे पथक आणि सातपूर पोलिसांच्या संयुक्त पथकाने जळगाव जिल्ह्यातील बोदवड येथे छापा टाकून या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधाराला बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी संशयिताच्या ताब्यातून १४ लाख रुपये किमतीची १०.५ तोळे (१०५ ग्रॅम) वजनाची सोन्याची लगड हस्तगत करण्यात मोठे यश मिळवले आहे. संभाजी विलास कवळे (वय ३०, रा. आनंदवली, गंगापूर रोड, नाशिक) असे अटक करण्यात आलेल्या संशयित मुख्य सूत्रधाराचे नाव आहे.
कार अडवून गळ्यातील चेन केल्या होत्या लंपास
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ मार्च २०२६ रोजी रात्रीच्या सुमारास सातपूर बसस्टँडसमोरील कानिफनाथ मंदिराजवळ हा थरार घडला होता. फिर्यादी टेलरिंग व्यावसायिक आपली कार बंद करून घरी जाण्याच्या तयारीत असतानाच तीन अज्ञात इसमांनी त्यांची कार अडवली. संशयितांनी त्यांना चाकूचा धाक दाखवत मारहाण केली आणि त्यांच्या गळ्यातील दोन जाड सोन्याच्या चेन बळजबरीने हिसकावून पोबारा केला होता. या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
चार जिल्ह्यात पाठलाग; दोन महिन्यांनी लागला छडा
गुन्हा दाखल झाल्यापासून संशयित आरोपी पोलिसांना सतत चकवा देत होता. त्यामुळे गुन्हे शाखेचे पथक मागील दोन महिन्यांपासून जळगाव, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर आणि पुणे जिल्ह्यांत ठाण मांडून संशयिताचा माग काढत होते. अखेर २८ मे रोजी पोलिसांना संशयित संभाजी कवळे जळगाव जवळील बोदवड येथे लपून बसल्याची गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पथकाने तात्काळ सापळा रचून त्याच्या मुसक्या आवळल्या.
पोलीस कोठडीत घेतलेल्या सखोल चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली, तसेच चोरलेल्या सोन्याच्या चेन वितळवून तयार केलेली १४ लाखांची सोन्याची लगड पोलिसांनी जळगावमधून जप्त केली.
या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कामगिरी
ही धडाकेबाज कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त किरणकुमार चव्हाण, किशोर काळे, सहाय्यक आयुक्त संदीप मिटके व सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या मोहिमेत सातपूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश अहिरे, गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी हेमंत तोडकर, पोलीस उपनिरीक्षक आजिनाथ बटुळे व त्यांच्या विशेष पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली.