सिंहस्थाच्या कामांवर 'आयआयटी'ची नजर... गुणवत्तेशी तडजोड केल्यास...

Share:
Main Image
Last updated: 05-Jun-2026

नाशिक, (प्रतिनिधी) ५ जून - "सिंहस्थ कुंभमेळा २०२७ साठी उभारण्यात येणाऱ्या सर्व पायाभूत सुविधा आणि विकासकामे वेळेत पूर्ण होण्याबरोबरच ती सुरक्षित, दर्जेदार आणि दीर्घकाळ टिकणारी असणे आवश्यक आहे. या कामांच्या दर्जात कोणत्याही प्रकारची तडजोड खपवून घेतली जाणार नाही," असा सज्जड दम नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी दिला आहे. सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर आयोजित विशेष 'गुणवत्ता नियंत्रण प्रशिक्षण कार्यशाळेत' ते बोलत होते.

'आयआयटी बॉम्बे'च्या तज्ज्ञांकडून धडे

कुंभमेळ्याच्या नियोजित आणि सुरू असलेल्या कामांमध्ये तांत्रिक अचूकता राहावी, यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यात आयआयटी बॉम्बेचे प्रा. डॉ. धरमवीर सिंह आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे निवृत्त अधीक्षक अभियंता किशोर पाटील यांनी उपस्थित अभियंत्यांना मार्गदर्शन केले.

कामांच्या प्रत्येक टप्प्यावर घ्यावयाची काळजी, गुणवत्ता तपासणी (Quality Check), 'रिक्वेस्ट फॉर इन्स्पेक्शन' (RFI) प्रक्रिया, प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणची तपासणी पद्धती, विविध तांत्रिक चाचण्या आणि आवश्यक दस्तऐवजीकरण (Documentation) याविषयी या कार्यशाळेत सविस्तर चर्चा करण्यात आली.

"अभियंत्यांचे क्षमता संवर्धन महत्त्वाचे"

"कोट्यवधी भाविकांच्या सुरक्षेच्या आणि सोयीच्या दृष्टीने कुंभमेळ्याची कामे अत्यंत महत्त्वाची आहेत. प्रत्येक अंमलबजावणी यंत्रणेने गुणवत्ता निकषांचे काटेकोर पालन करावे. क्षेत्रीय पातळीवर काम करणाऱ्या अभियंत्यांचे आणि पथकांचे क्षमता संवर्धन (Capacity Building) दर्जेदार कामांसाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल."

Advertisement

— शेखर सिंह, आयुक्त, कुंभमेळा प्राधिकरण

बड्या अधिकाऱ्यांची उपस्थिती आणि विविध विभागांचा सहभाग

या उच्चस्तरीय कार्यशाळेला कुंभमेळा प्राधिकरण आयुक्त शेखर सिंह यांच्यासह नाशिक मनपा आयुक्त मनीषा खत्री, अतिरिक्त आयुक्त अमित रंजन, अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, पीडब्ल्यूडीचे मुख्य अभियंता प्रशांत औटी, मनपा शहर अभियंता संजय अग्रवाल आणि प्राधिकरणाचे उपायुक्त (नियोजन) योगेंद्र चौधरी उपस्थित होते.

या यंत्रणांचे अभियंते झाले सहभागी:

सिंहस्थाची कामे करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD), नाशिक महानगरपालिका, जलसंपदा विभाग, महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ (MSIDC), जिल्हा परिषद, त्र्यंबकेश्वर व शिर्डी नगरपरिषद, आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) या सर्व प्रमुख विभागांचे वरिष्ठ अधिकारी व अभियंते या प्रशिक्षणात प्रामुख्याने सहभागी झाले होते.

या सर्व विकासकामांमध्ये यापुढे नियमित देखरेख ठेवून प्रत्येक टप्प्यावर त्रयस्थ गुणवत्ता तपासणी (Third Party Quality Audit) करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.

?s=20

Advertisement

Comments

No comments yet.