अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे टेन्शन मिटणार!  निवृत्तीचे वय आता... ग्रॅज्युएटी आणि थकीत मानधन...

Share:
Main Image
Last updated: 31-May-2026

मुंबई, (प्रतिनिधी) ३१ मे - राज्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि बालकांच्या कल्याणासाठी राज्य सरकार अनेक महत्त्वाचे आणि सकारात्मक निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. अंगणवाडी मदतनीस पदावरून थेट नियुक्तीने अंगणवाडी सेविका झालेल्या कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय ६० वरून ६५ वर्षे करण्याबाबत शासन सकारात्मक पावले उचलत आहे, अशी महत्त्वपूर्ण माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आज येथे दिली.
अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत मंत्रालयात आयोजित करण्यात आलेल्या विशेष बैठकीत त्या बोलत होत्या. या बैठकीत अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या प्रतिनिधींशी विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

बालकांच्या आहाराच्या दरात वाढ होणार
अंगणवाडीतील बालकांना अधिक गुणवत्तापूर्ण, उत्कृष्ट आणि पोषक आहार उपलब्ध करून देण्यासाठी 'आहार दरवाढीबाबत' शासन स्तरावर सकारात्मक कार्यवाही सुरू असून, तसा प्रस्ताव सध्या प्रक्रियेत असल्याची माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.

Advertisement

बैठकीतील महत्त्वाचे निर्णय आणि आश्वासने:
ग्रॅज्युएटी (उपदान): कर्मचाऱ्यांच्या उपदानाचा प्रश्न सोडवण्यासाठी महिला व बालविकास विभागामार्फत वित्त विभागाकडे रीतसर प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.
मानधन व भत्ता: अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा प्रोत्साहन भत्ता आणि केंद्र शासनाकडील थकीत मानधन तातडीने अदा करण्याबाबतची प्रशासकीय कार्यवाही सुरू आहे.
अंगणवाड्या डिजिटल होणार: अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन कामकाजातील तांत्रिक अडचणी कमी करण्यासाठी आणि त्यांना ऑनलाईन काम करणे सोपे व्हावे, यासाठी अंगणवाडी केंद्रांमध्ये वाय-फाय (Wi-Fi) सुविधा उपलब्ध करून दिली जाईल.
केंद्रांची भाडेवाढ: महानगरपालिका क्षेत्रातील अंगणवाडी केंद्रांच्या भाडेवाढीसंदर्भात केंद्र सरकारकडे प्रस्ताव सादर करण्यात आला असून, त्याबाबत राज्य शासनाकडून सातत्याने पाठपुरावा केला जात आहे.

वरिष्ठ अधिकारी व संघटना प्रतिनिधींची उपस्थिती
मंत्रालयात झालेल्या या महत्त्वाच्या बैठकीला महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉ. अनुपकुमार यादव, आयुक्त माधवी सरदेशमुख, सहसचिव वि.रा. ठाकूर, एकात्मिक बालविकास सेवा योजनेचे (ICDS) विजय क्षीरसागर यांच्यासह भारतीय कामगार संघटनेचे अध्यक्ष डॉ. डी.एल. कराड आणि अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षा शुभा शमीम आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

Comments

No comments yet.