अरे हे चाललंय काय? २१ जूनच्या नीट फेरपरीक्षेचा पेपर थेट १० लाखांना...

Share:
Main Image
Last updated: 25-May-2026

मुंबई, (प्रतिनिधी) २५ मे - "नीट (NEET) परीक्षेतील पेपरफुटी आणि गोंधळाच्या धक्क्यातून देशभरातील लाखो विद्यार्थी आणि पालक अजून सावरलेलेही नाहीत. तोच आता 'री-नीट' (पुनर्परीक्षा) परीक्षेच्या नावाखाली देशपातळीवर एक प्रचंड मोठा सायबर घोटाळा सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. फेरपरीक्षेचा पेपर तब्बल १० लाख रुपयांना 'टेलेग्राम' (Telegram) या सोशल मीडिया ॲपच्या माध्यमातून विकला जात असून, याप्रकरणी अहमदाबाद सायबर गुन्हे शाखेकडे अधिकृत तक्रार दाखल झाली आहे."

अशी आहे सायबर भामट्यांची 'मोडस ऑपेरंडी':
या घोटाळ्याची पाळेमुळे अत्यंत खोलवर पसरली असून संशयित आरोपींनी अतिशय नियोजनबद्ध जाळे विणले आहे:
टोकन अमाऊंट: सुरुवातीला टेलिग्रामवरील एका मुख्य ग्रुपमध्ये सहभागी करून घेण्यासाठी विद्यार्थ्यांकडून २०० ते ५०० रुपये 'टोकन' म्हणून घेतले जातात.
गोपनीय मिटिंग: ग्रुपमध्ये सामील केल्यानंतर ॲडमिनद्वारे पेपर मिळवण्यासंदर्भात एक गुप्त ऑनलाइन मिटिंग घेतली जाते.
अॅप्लिकेशनचा वापर: पोलिसांना बँक अकाऊंटचा सुगावा लागू नये म्हणून पैसे ट्रान्सफर करण्यासाठी विशिष्ट आणि संशयास्पद ॲप्लिकेशन्सचा वापर केला जातो.
१० लाखांची मागणी: मुख्य ग्रुपमध्ये प्रवेश करण्यासाठी आधी ६० हजार रुपये उकळले जातात आणि त्यानंतर प्रत्यक्ष पेपरसाठी १० लाख रुपयांची मागणी केली जाते. २१ जून रोजी होणाऱ्या परीक्षेच्या आधीच पेपर देणार असल्याचा दावा या टोळीने केला आहे.

Advertisement

७ हजारहून अधिक लोकांना गंडा; ५ कोटींहून अधिकची वसुली!
शुभम ठाकर या विद्यार्थ्याने केलेल्या खळबळजनक दाव्यानुसार, टेलिग्रामवर 'राघव सर' नावाच्या चॅनेलच्या माध्यमातून नीटचा बनावट किंवा लीक झालेला पेपर उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखवण्यात आले. या माध्यमातून आरोपींनी आतापर्यंत तब्बल ५ कोटी ७४ लाख रुपये कमावल्याचा अंदाज आहे. वेगवेगळ्या ग्रुप्सच्या माध्यमातून आतापर्यंत देशातील सुमारे ७ हजार ९०१ लोकांना या टोळीने जाळ्यात ओढून पेपर पुरवल्याचा संशय व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, या टोळीचा विरोध करणाऱ्यांना धमकीवजा इशाराही दिला जात असल्याचे समोर आले आहे.

नीटचा 'गॉड'फादर कोण?
या संपूर्ण प्रकरणात एका 'गॉड' (GOD) नावाच्या नंबरवरून संशयास्पद संवाद साधला जात आहे. त्यामुळे या संपूर्ण रॅकेटचा मास्टरमाईंड किंवा 'गॉडफादर' नेमका कोण आहे? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. ३ मे रोजी झालेल्या नीट परीक्षेचा पेपर फुटल्यानंतर सीबीआयने (CBI) वेगात तपास करत अनेक आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत, असे असताना आता पुनर्परीक्षेचा पेपरही विकला जात असल्याने ही यंत्रणा नेमकी कोणाची? याच्या मुळाशी तपास यंत्रणा कधी पोहोचणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 'नीट'मुळे 'महाटीईटी' (MAHA TET) लांबणीवर!
'नीट' परीक्षेच्या या संपूर्ण गोंधळामुळे आणि फेरपरीक्षेच्या नियोजनामुळे महाराष्ट्रातील 'शिक्षक पात्रता परीक्षा' (महाटीईटी) देखील लांबणीवर पडली आहे. परीक्षा परिषदेकडून लवकरच या परीक्षेची नवीन तारीख अधिकृतपणे जाहीर केली जाणार आहे.

Comments

No comments yet.