शिवसेना शिंदे गटाच्या तालुकाध्यक्षाची वृद्ध महिलेला मारहाण... येवला तालुक्यातील धक्कादायक प्रकार... पांडुरंग शेळकेसह पाच जणांवर गुन्हा....

Share:
Last updated: 22-May-2026

येवला, (प्रतिनिधी) २२ मे - येवला तालुक्यातील धुळगाव येथील निराधार वृद्ध महिलेला घरकुल मंजूर झाले असताना त्याला विरोध करत महिलेला मारहाण केल्याप्रकरणी शिवसेना शिंदे गटाचे येवला तालुका प्रमुख पांडुरंग शेळके यांच्यासह पाच जणांवर येवला तालुका पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये पांडुरंग शेळके यांच्यासह काही जणांना पोलिसांनी अटक केली असून पोलिस पुढील तपास करत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, धुळगाव येथील मीराबाई मगन जाधव या निराधार वृद्ध महिलेला शासनाकडून घरकुल योजना मंजूर झाली आहे. संबंधित महिलेकडून आवश्यक सर्व शासकीय प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्यानंतर घरकुलासाठी खोदकाम सुरू करण्यात आले. मात्र काम सुरू होताच पांडुरंग शेळके व त्यांच्या कुटुंबीयांनी जागेवर येऊन कामाला विरोध केला. तसेच यावेळी पांडुरंग शेळके व इतरांकडून संबंधित महिलेला शिवीगाळ करत दमदाटी करण्यात आली. तसेच मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार ग्रामीण पोलिसांत दाखल करण्यात आली आहे. 

Advertisement

या प्रकरणी शिवसेना (शिंदे गट) तालुका अध्यक्ष पांडुरंग शेळके, वाल्मिक शेळके, विठ्ठल शेळके, अंजनाबाई शेळके, आरती शेळके आणि लता शेळके यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 अंतर्गत कलम 190, 191(2), 191(3), 115(2), 352, 351(2) आणि 351(3) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांनी तत्काळ कारवाई करत पांडुरंग शेळके व त्यांच्या दोन भावांना ताब्यात घेत अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून ग्रामस्थांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

“महिलांच्या हक्कासाठी बोलणारेच जर गरीब आणि निराधार महिलांवर अन्याय करत असतील, तर सामान्य नागरिकांनी न्याय कुणाकडे मागायचा?” असा सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे. दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास ग्रामीण पोलीस करत आहेत.

Advertisement

Comments

No comments yet.