मराठी विद्यार्थ्यांना थेट इस्रो आणि नासा मध्ये नेणार... राज्य सरकारची ३.३० कोटींची मोठी योजना...

Share:
Main Image
Last updated: 07-May-2026

मुंबई, (प्रतिनिधी) ७ मे - राज्यातील शालेय विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजावा आणि त्यांना जागतिक दर्जाच्या संशोधन संस्थांचा अनुभव मिळावा, यासाठी राज्य सरकारने ‘मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी’ हा अभिनव उपक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील गुणवंत विद्यार्थ्यांना भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) आणि अमेरिकेतील प्रसिद्ध 'नासा' (NASA) केंद्राला भेट देण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिली.

अनुभवाधारित शिक्षणावर भर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार, विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता अनुभवाधारित शिक्षण मिळावे, हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे. यासाठी राज्य शासनाने ३.३० कोटी रुपयांच्या खर्चास मंजुरी दिली असून, शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने याबाबतचा शासन निर्णय (GR) निर्गमित केला आहे.

निवड प्रक्रिया आणि संधी:  तालुकास्तर: तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्रथम येणाऱ्या २,१४८ विद्यार्थ्यांना त्यांच्या जवळच्या विज्ञान केंद्रांना भेट देण्याची संधी मिळेल.

जिल्हास्तर: जिल्हास्तरावर निवड झालेल्या १८० विद्यार्थ्यांना बंगळुरू येथील 'इस्रो' (ISRO) केंद्राची सफर घडवून आणली जाईल.

Advertisement

राज्यस्तर: राज्यस्तरीय प्रदर्शनात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ५१ विद्यार्थ्यांना (इयत्ता ६ वी ते १२ वी) थेट अमेरिकेतील 'नासा' (NASA) केंद्राला भेट देण्याची विशेष संधी मिळणार आहे.

अंमलबजावणीसाठी समित्यांची स्थापना या उपक्रमाच्या नियोजनासाठी तालुका, जिल्हा आणि राज्यस्तरावर स्वतंत्र समित्या स्थापन करण्यात येणार आहेत. जिल्हा नियोजन समिती आणि राज्याच्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून या खर्चासाठी निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे.

"राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये संशोधनवृत्ती आणि वैज्ञानिक जिज्ञासा निर्माण करण्यासाठी हा उपक्रम मैलाचा दगड ठरेल. यामुळे भविष्यातील भारतीय संशोधक घडण्यास मोठी मदत होईल," असा विश्वास मंत्री दादाजी भुसे यांनी व्यक्त केला.

?s=20

Comments

No comments yet.