महिलेला बेशुद्ध करून काढले नग्न फोटो... खंडणी उकळणारा नराधम जेरबंद...

Share:
Main Image
Last updated: 04-May-2026

नाशिक, (प्रतिनिधी) ४ मे -  सोशल मीडियावरील आभासी जगातील मैत्री किती घातक ठरू शकते, याचा धक्कादायक अनुभव नाशिकमधील एका ३५ वर्षीय महिलेला आला आहे. गुंगीचे औषध देऊन अश्लील फोटो व व्हिडिओ काढणाऱ्या आणि त्याद्वारे खंडणी उकळणाऱ्या एका भामट्याविरोधात पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निलेश अशोक पगार (वय ३०, रा. उतराणी-नामपूर, ता. सटाणा) असे या संशयित नराधमाचे नाव आहे.

मैत्रीचा बनाव आणि गुंगीचे औषध

फेसबुकवर ओळख झाल्यानंतर संशयित निलेश पगार याने महिलेचा विश्वास संपादन केला. २६ मार्च रोजी त्याने महिलेला गोदाघाटावर भेटण्यासाठी बोलावले. गप्पा मारत असताना त्याने पिण्याच्या पाण्यात गुंगीचे औषध मिसळून महिलेला दिले. महिला बेशुद्ध झाल्याचा फायदा घेत त्याने तिला जवळच्या एका हॉटेलमध्ये नेले आणि तिथे तिचे निर्वस्त्र फोटो व अश्लील व्हिडिओ शूट केले.

असा झाला ब्लॅकमेलिंगचा खेळ

महिलेला शुद्ध आल्यावर त्याने तिला घरी पाठवले, मात्र सायंकाळी फोन करून फोटोंच्या बदल्यात पैशांची मागणी सुरू केली. "पैसे दिले नाही तर व्हिडिओ व्हायरल करेन," अशी धमकी दिल्याने घाबरलेल्या महिलेने आपली जमापुंजी रोख आणि ऑनलाईन स्वरूपात त्याच्या हवाली केली. मात्र, संशयिताची पैशांची हाव वाढतच गेल्याने अखेर पीडित महिलेने हिंमत दाखवून पोलिसांत धाव घेतली.

Advertisement

पोलिसांचे आवाहन: सतर्क राहा!

या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक पंकज सोनवणे करत आहेत. पोलिसांनी या निमित्ताने नागरिकांना विशेषतः महिलांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे:

सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तींशी मैत्री करताना सावध राहा.

अनोळखी व्यक्तीने दिलेल्या खाद्यपदार्थ किंवा पेयांचे सेवन करू नका.

ब्लॅकमेलिंगचा प्रकार घडल्यास घाबरून न जाता तातडीने पोलिसांशी संपर्क साधा.

Comments

No comments yet.