मुंबई, (प्रतिनिधी) ३० एप्रिल - गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय वर्तुळात चर्चेत असलेल्या विधान परिषदेच्या उमेदवारीचा सस्पेन्स राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) अखेर संपवला आहे. पक्षातील अनेक दिग्गजांना आणि ८० हून अधिक इच्छुकांना मागे टाकत झिशान सिद्दीकी यांच्या नावावर पक्षाने शिक्कामोर्तब केले आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सिद्दीकी यांच्यावर विश्वास दाखवल्याने त्यांच्या राजकीय कारकिर्दीला आता मोठी संजीवनी मिळाली आहे.
८० इच्छुकांची गर्दी अन् ५ नावांचे शॉर्टलिस्टिंग
विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीमध्ये मोठी चुरस पाहायला मिळाली. पक्षातील तब्बल ८० नेत्यांची नावे या शर्यतीत होती. त्यातून पाच नावांची अंतिम यादी तयार करण्यात आली होती. सूत्रांच्या माहितीनुसार, पार्थ पवार यांनी विक्रम काकडे यांच्या नावासाठी आग्रह धरला होता, तर इतर अनेक नेतेही आपापल्या समर्थकांसाठी फिल्डिंग लावून होते. मात्र, वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत झिशान सिद्दीकी यांच्या नावावर एकमत झाले.
झिशान यांच्यासाठी राजकीय 'संजीवनी'
झिशान सिद्दीकी आणि त्यांचे दिवंगत वडील बाबा सिद्दीकी यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर सिद्दीकी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत झिशान यांना पराभवाचा सामना करावा लागल्याने त्यांच्या राजकीय भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मात्र, राष्ट्रवादीने त्यांना विधान परिषदेची उमेदवारी देऊन त्यांचे पुनर्वसन केले आहे.
मुंबईत ताकद वाढवण्याचा 'गेम प्लॅन'
झिशान सिद्दीकी यांच्या उमेदवारीमागे राष्ट्रवादीची मोठी रणनीती असल्याचे बोलले जाते:
मुंबई महापालिका डोळ्यासमोर: मुंबईत राष्ट्रवादीची पकड मजबूत करण्यासाठी सिद्दीकी यांचा चेहरा उपयुक्त ठरू शकतो.
तरुण आणि उच्चभ्रू मतदारांवर प्रभाव: झिशान यांचा उच्चभ्रू वर्गातील वावर आणि बॉलिवूड कनेक्शनचा पक्षाला फायदा होण्याची शक्यता आहे.
मुस्लिम मतांचे ध्रुवीकरण: मुंबईतील अल्पसंख्याक मतदारांना आकर्षित करण्यासाठी सिद्दीकी हे पक्षासाठी महत्त्वाचे ठरतील.
सुनेत्रा पवारांची मध्यस्थी आणि फडणवीसांची भेट
या उमेदवारीपूर्वी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. या भेटीनंतरच झिशान यांच्या नावावर मोहोर उमटवण्यात आल्याने या निर्णयाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.