नाशिक, (प्रतिनिधी) २९ एप्रिल - कुख्यात रमेश गोयल याच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात सहभाग असल्याचे भासवून आणि अटकेची भीती घालून सायबर भामट्यांनी शहरातील एका दाम्पत्याला १० लाख रुपयांना गंडा घातला आहे. मुंबई क्राईम ब्रँचमधून बोलत असल्याची बतावणी करत भामट्यांनी या दाम्पत्याची आर्थिक व स्थावर मालमत्तेची माहिती मिळवून ही रक्कम हडपली. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात फसवणुकीसह आयटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
'डिजिटल अरेस्ट'चा बनाव
तक्रारदाराशी गेल्या मार्च महिन्यात व्हॉट्सॲप कॉलच्या माध्यमातून संपर्क साधण्यात आला होता. "तुमच्या पत्नीच्या आधारकार्डवर मिळवलेल्या सिमकार्डचा गैरवापर झाला आहे," असे सांगून भामट्यांनी दाम्पत्याचे मानसिक खच्चीकरण केले. रमेश गोयल मनी लाँड्रिंग प्रकरणात सहभाग असल्याचे सांगून त्यांनी चक्क तक्रारदाराच्या पत्नीच्या मोबाईलवर बनावट 'अरेस्ट वॉरंट' पाठवले.
धमकावून उकळले पैसे
"तपासात सहकार्य करा, नाहीतर अटक करू," अशी धमकी देत सायबर भामट्यांनी या दाम्पत्याकडून त्यांच्या बँक खात्याचे तपशील आणि स्थावर मालमत्तेची सर्व माहिती काढून घेतली. अटकेच्या भीतीने हादरलेल्या दाम्पत्याने भामट्यांनी सांगितल्यानुसार वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये तब्बल १० लाख रुपये जमा केले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच दाम्पत्याने पोलिसांत धाव घेतली.
सध्या सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संजय पिसे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
पोलीस आवाहन:
पोलीस किंवा कोणतीही सरकारी यंत्रणा व्हॉट्सॲप कॉलवर 'अरेस्ट वॉरंट' पाठवत नाही किंवा अटकेची भीती घालून पैशांची मागणी करत नाही. अशा कॉलला बळी पडू नका आणि संशय आल्यास तात्काळ १९३० या हेल्पलाईनवर संपर्क साधावा.