नाशिक, (प्रतिनिधी) २९ एप्रिल - शहर आणि परिसरात गेल्या काही दिवसांत झालेल्या वेगवेगळ्या चार भीषण रस्ते अपघातांमध्ये एका पाच वर्षीय बालिकेसह चार जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. मृतांमध्ये एक तरुण आणि एका वृद्धाचाही समावेश असून, या घटनांनी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे व मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
१. पाच वर्षीय खुशीचा दुर्दैवी अंत
अपघाताची पहिली हृदयद्रावक घटना अश्विननगर भागात घडली. खुशी रमेश गावीत (५, रा. अंबड) ही बालिका आपल्या काकांसोबत दुचाकीवरून (MH 15 HX 8994) जात असताना 'सोनाली मटन भाकरी' हॉटेलसमोर एका अज्ञात दुचाकीस्वाराने जोरात कट मारला. यामुळे दुचाकी घसरून झालेल्या अपघातात खुशी गंभीर जखमी झाली. तिला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. अंबड पोलिसांनी अज्ञात दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
२. देवळाली गावात पिकअपच्या धडकेत तरुणाचा मृत्यू
देवळाली गावातील अजमेरी गॅरेजसमोर झालेल्या अपघातात रॉकी सुरेश श्रीसुंदर (२९, रा. पंचवटी) या तरुणाचा मृत्यू झाला. रॉकी आपल्या दुचाकीवरून (MH 15 GQ 9524) जात असताना पाठीमागून आलेल्या भरधाव पिकअपने (MH 15 JW 5592) त्याला जोरदार धडक दिली. गंभीर जखमी रॉकीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नाशिकरोड पोलिसांनी पिकअप चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
३. शिंदे गावात अज्ञात वाहनाची वृद्धाला धडक
तिसरा अपघात शिंदे गावातील वृंदावन हॉटेलसमोर घडला. सुरेश शंकर तुंगार (७८, रा. शिंदेगाव) हे मंगळवारी सकाळी दुचाकीवरून जात असताना एका अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. उपचारासाठी बिटको रुग्णालयात दाखल केले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले. नाशिकरोड पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.
४. उपचारादरम्यान मोहाडीच्या व्यक्तीचा मृत्यू
चौथा अपघात आडगाव-मोहाडी मार्गावर ९ मार्च रोजी घडला होता. विशाल माधवराव झोलेकर (४२, रा. मोहाडी) हे दुचाकीवरून (MH 15 ER 8837) जात असताना आडगाव फाटा येथे अज्ञात पिकअपने त्यांना धडक दिली होती. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यावर आडगाव मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू होते. मात्र, मंगळवारी (दि. २८) त्यांची प्राणज्योत मालवली. आडगाव पोलीस ठाण्यात या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.