नाशिक, (प्रतिनिधी) २९ एप्रिल - शेतजमीन विकत घेण्याचे आमिष दाखवून आणि परस्पर सातबारा उताऱ्यावर नाव लावून घेत एका शेतकऱ्याची १ कोटी ८ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात वडाळा गावातील पाच संशयितांसह आडगाव तलाठी कार्यालयातील तत्कालीन अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासीन रूऊफ मुसानी (रा. वडाळा रोड) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. मुसानी यांची आडगाव शिवारात गट नं. १७५६ मध्ये ३४ गुंठे शेतजमीन आहे.
असे रचले फसवणुकीचे जाळे
सन २०२२ मध्ये संशयितांनी मुसानी यांचा विश्वास संपादन केला आणि त्यांची शेतजमीन विकत घेण्याची तयारी दर्शविली. या व्यवहाराचा मोबदला म्हणून मुसानी यांना '३-बीएचके'च्या दोन सदनिका (फ्लॅट) देण्याचे ठरले होते. या अटीवर ५०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर करारनामा करण्यात आला. मात्र, मुसानी यांच्या अज्ञानाचा फायदा घेत संशयितांनी करारनाम्यात खोटा मजकूर लिहून घेतला.
तलाठी कार्यालयातील 'मिलीभगत'
फिर्यादीत म्हटले आहे की, संशयितांनी आडगाव तलाठी कार्यालयातील तत्कालीन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना हाताशी धरले. जमिनीचा कोणताही मोबदला न देता किंवा सदनिकांचा ताबा न देता, कागदपत्रांमध्ये फेरफार करून सातबारा उताऱ्यावर तौसिफ इनामदार याचे नाव चढवले. १ कोटी ८ लाख रुपये किमतीच्या सदनिका देण्याचे आमिष दाखवून संशयितांनी एक रुपयाही न देता मुसानी यांची हक्काची जमीन गिळंकृत केली.
यांच्यावर झाला गुन्हा दाखल:
तौसिफ नजीर इनामदार, शिफा तौसिफ इनामदार, मकसुद नजीर इनामदार, सलीम रशीद शेख, अर्षद सलीम शेख (सर्व रा. वडाळागाव) आणि आडगाव तलाठी कार्यालयातील तत्कालीन अधिकारी व कर्मचारी.
या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बोंडे करत आहेत. सरकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांचा यात समावेश असल्याने महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे.