तरुणांच्या रोजगारासाठी महाराष्ट्राचे ‘महाचतुर’ पाऊल... मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘AI चॅटबॉट’चे लोकार्पण...

Share:
Main Image
Last updated: 27-Apr-2026

मुंबई, (प्रतिनिधी) २७ एप्रिल - राज्यातील युवकांना कौशल्य प्रशिक्षण, रोजगार, उद्योजकता आणि मार्गदर्शन एकाच व्यासपीठावर उपलब्ध करून देणारा 'महाचतुर एआय चॅटबॉट' हा महाराष्ट्रासाठी परिवर्तनकारी उपक्रम आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या पुढाकारातून विकसित करण्यात आलेला हा चॅटबॉट देशात राज्य शासनाने तयार केलेला अशा प्रकारचा पहिलाच अभिनव उपक्रम आहे. या चॅटबॉटमुळे युवा वर्गाचा शिक्षण ते रोजगार हा प्रवास अधिक सुकर होईल आणि उद्योगांना कुशल मनुष्यबळ त्वरित उपलब्ध होईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘चॅटबॅाट’ लोकार्पण प्रसंगी केले.

महाराष्ट्रात कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभाग प्रभावीपणे काम करत असून उद्योगांच्या गरजांनुसार प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करण्यावर भर दिला जात आहे. उद्योगांना प्रशिक्षित मनुष्यबळ हवे आहे आणि तरुणांना रोजगार हवा आहे. या दोघांमध्ये प्रभावी दुवा निर्माण करण्याचे काम ‘महाचतुर चॅटबॉट' करणार आहे. एआय आधारित ‘चॅटबॉट’ कौशल्य प्रशिक्षण, रोजगार संधी, उद्योजकता मार्गदर्शन, अर्ज प्रक्रिया, असेसमेंट आणि मार्केट लिंकेज अशा सर्व सेवा वन-स्टॉप सोल्युशन म्हणून उपलब्ध करून देणार आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

सह्याद्री अतिथीगृह येथे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या ‘चॅटबॅाट’ लोकार्पण व सामंजस्य करार पार पडले. यावेळी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा, अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा, राज्य नाविन्यता सोसायटीचे आयुक्त डॉ.अमित सैनी, व्यवसाय व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक सतीश सूर्यवंशी, जपानचे वाणिज्यदूत हितोमि साटो, जर्मनीचे वाणिज्य दूत क्रिस्टोफ हेलिअर, कोरियाचे वाणिज्य दूत यो डाँवॉन, फिनलँडचे वाणिज्य दूत इरिक एफ हॉलस्ट्रॉम तसेच विविध उद्योग व शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी, आंतरराष्ट्रीय भागीदार उपस्थित होते.

Advertisement

मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले की, राज्यातील असंघटित कौशल्य क्षेत्राला एकत्र आणून महाराष्ट्राच्या प्रगतीला अधिक बळ देण्यासाठी एक सक्षम व्यासपीठ उभारण्याचा प्रयत्न करण्यात येईल. मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली कौशल्य विभागात अनेक अभिनव योजना व उपक्रम राबविले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आयपीई ग्लोबल लिमिटेड, नॅशनल स्किल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, मुंबई, श्रीमद राजचंद्र एज्युकेशनल ट्रस्ट, श्री श्री रुरल डेव्हलपमेंट प्रोग्राम ट्रस्ट, यूएन-वूमेन यांनी सामंजस्य करारांवर स्वाक्षरी केल्या.

?s=20

Comments

No comments yet.