नवी दिल्ल, (प्रतिनिधी) २६ एप्रिल - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा सहभाग असलेल्या एका कार्यक्रमात गोळीबाराची धक्कादायक घटना घडली आहे. व्हाईट हाऊसच्या पत्रकारांसोबत (करस्पॉन्डंट्स डिनर) ट्रम्प एका हॉटेलमध्ये असताना हा हल्ला झाला. गोळीबाराचा आवाज होताच सुरक्षा रक्षकांनी तातडीने कडे करून ट्रम्प यांना सुरक्षितस्थळी हलवले. सुदैवाने, या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाली नसून संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प हे व्हाईट हाऊसच्या पत्रकारांसोबत रात्रीच्या भोजनासाठी (डिनर) एका हॉटेलमध्ये पोहोचले होते. कार्यक्रम सुरू असतानाच अचानक एका अज्ञात हल्लेखोराने सात ते आठ गोळ्या झाडल्या. गोळीबारामुळे हॉटेलमध्ये एकच गोंधळ उडाला. सुरक्षा यंत्रणेने तत्परता दाखवत ट्रम्प यांना तातडीने हॉटेलबाहेर नेले आणि सुरक्षित ठिकाणी हलवले.
सुरक्षा रक्षकावर गोळी झाडली
हल्लेखोराने केलेल्या गोळीबारातील एक गोळी सुरक्षेसाठी तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकाच्या बुलेटप्रूफ जॅकेटला लागली. सुदैवाने, बुलेटप्रूफ जॅकेटमुळे या अधिकाऱ्याचा जीव वाचला असून त्याची प्रकृती सध्या स्थिर आहे. त्याच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हल्लेखोर ताब्यात
गोळीबारानंतर सुरक्षा रक्षकांनी तत्काळ कारवाई करत संशयित आरोपीला झडप घालून ताब्यात घेतले. त्याच्याकडून शस्त्रे जप्त करण्यात आली असून, सध्या त्याची सखोल चौकशी सुरू आहे. या हल्ल्यामागचा नेमका हेतू काय होता, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
"हा कार्यक्रम अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा सन्मान करण्यासाठी आणि सर्वांना एकत्र आणण्यासाठी आयोजित केला होता. सुरक्षेबाबत कोणतीही पूर्वसूचना नव्हती, मात्र सुरक्षा यंत्रणेने वेळीच पावले उचलल्याने मोठी दुर्घटना टळली. मी जखमी अधिकाऱ्याशी संवाद साधला असून त्याची प्रकृती ठीक आहे."