देशभरातून फक्त १९ मुली, त्यात नाशिकच्या दोन...  एनडीए परीक्षेत जिया आणि समृद्धीचे देदिप्यमान यश...

Share:
Main Image
Last updated: 23-Apr-2026

मुंबई, (प्रतिनिधी) २३ एप्रिल - नाशिक येथील मुलींच्या सैनिकी सेवापूर्व प्रशिक्षण संस्थेने उल्लेखनीय यश मिळवले असून या केंद्रातून राष्ट्रीय संरक्षण अकादमी (एनडीए) साठी दोन विद्यार्थिनींची अंतिम निवड झाली आहे. विशेष म्हणजे या दोन्ही विद्यार्थिनींनी देशपातळीवर मुलींमध्ये अनुक्रमे दुसरा आणि पंधरावा क्रमांक मिळवला आहे. देशभरातून केवळ १९ मुलींची एनडीए साठी निवड होत असताना नाशिकच्या या केंद्राने मिळवलेले हे यश अत्यंत अभिमानास्पद मानले जात आहे.

निवड झालेल्या विद्यार्थिनींमध्ये जिया सचिन करपे हिने मुलींमध्ये अखिल भारतीय स्तरावर दुसरा क्रमांक (AIR-2) मिळवला आहे, तर कुमारी समृद्धी प्रविण इंगळे हिने १५ वा क्रमांक (AIR-15) पटकावला आहे. दोन्ही विद्यार्थिनींनी कठोर परिश्रम, शिस्तबद्ध प्रशिक्षण आणि गुणवत्तापूर्ण मार्गदर्शनाच्या बळावर हे यश संपादन केले आहे. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी या विद्यार्थिनींचे अभिनंदन केले आहे. 

Advertisement

महाराष्ट्र शासनाच्या पुढाकारातून नाशिक येथे १८ जून २०२३ रोजी मुलींची सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था सुरू करण्यात आली. राज्यातील मुलींना संरक्षण दलात अधिकारी म्हणून संधी मिळावी, या उद्देशाने ही संकल्पना राबविण्यात आली आहे. या संस्थेत इयत्ता ११ वी व १२ वीच्या विद्यार्थिनींना दोन वर्षांचा विशेष प्रशिक्षण अभ्यासक्रम दिला जातो. या संस्थेची स्थापना शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्याकडे माजी सैनिक कल्याण विभाग असताना करण्यात आली होती. विशेष बाब म्हणजे मुलींसाठी एनडीए भरतीपूर्व प्रशिक्षण देणारे हे देशातील पहिलेच केंद्र आहे.

यापूर्वीही या संस्थेने उल्लेखनीय कामगिरी केली असून मागील वर्षी हंसिका टिल्लू हिची एनडीए साठी निवड झाली होती. यंदा दोन विद्यार्थिनींची अंतिम निवड झाल्यामुळे या संस्थेच्या कार्याची दखल राष्ट्रीय स्तरावर घेतली जात आहे.

नाशिकमधील हे केंद्र भविष्यात अधिकाधिक विद्यार्थिनींना सशस्त्र दलात अधिकारी होण्यासाठी प्रेरित करेल, असा विश्वास शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी व्यक्त केला आहे.

Advertisement

Comments

No comments yet.