सिगारेट' दिली नाही म्हणून थेट चॉपरनेच कापला... पेठ रोड परिसरातील धक्कादायक प्रकार...

Share:
Main Image
Last updated: 21-Apr-2026

नाशिक, (प्रतिनिधी) २१ एप्रिल - सिगारेट दिली नाही या किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून एका सराईत गुन्हेगाराने २७ वर्षीय तरुणावर चॉपरने हल्ला करून त्याला ठार मारल्याची धक्कादायक घटना पेठ रोडवरील नवनाथनगर भागात घडली आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, पंचवटी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, राहुल कृष्णा राऊत (२७, रा. रामनगर, पेठरोड) हा तरुण शनिवारी (दि. १८) रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास नवनाथनगर येथील साईबाबा मंदिराजवळ आपले मित्र टिल्लू पवार आणि सुनील गुंजाळ यांच्यासह गप्पा मारत बसलेला होता. यावेळी संशयित आरोपी रोहिदास वामनराव आहेर (२६, रा. नवनाथनगर) तिथे आला. त्याने राहुलकडे सिगारेटची मागणी केली. मात्र, "आमच्याकडे सिगारेट नाही," असे राहुलने सांगताच संशयित रोहिदास संतप्त झाला.

Advertisement

चॉपरने केला हल्ला
रागाच्या भरात संशयित रोहिदासने त्याच्या कमरेला असलेला चॉपर काढला आणि राहुलच्या डोक्यावर व तोंडावर उलट्या बाजूने जोरदार प्रहार केले. या हल्ल्यात राहुल गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. त्याला तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दोन दिवसांच्या उपचारानंतर प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्याला घरी सोडण्यात आले होते.

उपचारादरम्यान मृत्यू
सोमवारी (दि. २०) राहुलला पुन्हा त्रास जाणवू लागल्याने कुटुंबीयांनी त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात हलवले. मात्र, तिथे तपासणी केल्यानंतर वैद्यकीय सूत्रांनी त्याला मृत घोषित केले. मुलाच्या मृत्यूने राऊत कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

संशयित फरार, पोलिसांकडून शोध सुरू
मृताचे वडील कृष्णा हरी राऊत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित रोहिदास आहेर याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित हा पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून घटनेनंतर तो फरार झाला आहे. पंचवटी पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक त्याचा शोध घेत आहे.

Comments

No comments yet.