नाशकात नराधमांचा उच्छाद... दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग

Share:
Main Image
Last updated: 20-Apr-2026

नाशिक, (प्रतिनिधी) २० एप्रिल - शहरात महिला आणि मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. वेगवेगळ्या दोन घटनांमध्ये दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग झाल्याचे उघडकीस आले असून, याप्रकरणी इंदिरानगर आणि नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यातील एका घटनेत संशयितांनी चक्क घरात घुसून पीडितेसह तिच्या आईलाही धक्काबुक्की केल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

पहिली घटना: बागेत खेळणाऱ्या मुलीला गाठले
विनयभंगाची पहिली घटना इंदिरानगर येथील सिटी गार्डन परिसरात शनिवारी (दि. १८) सायंकाळी घडली. संशयित अरशद अश्पाक शेख (रा. वडाळागाव) याने बागेत खेळणाऱ्या एका अल्पवयीन मुलीस 'ए बच्ची पिछे आ' असा आवाज देऊन जवळ बोलावले. मुलगी जवळ गेल्यानंतर बाकड्यावर बसलेल्या संशयिताने तिचा विनयभंग केला. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, पोलीस उपनिरीक्षक सपना पुरी अधिक तपास करत आहेत.

Advertisement

दुसरी घटना: घरात घुसून पीडितेसह आईलाही मारहाण
दुसरा धक्कादायक प्रकार विहीतगाव येथील बागुल नगर भागात शुक्रवारी (दि. १७) रात्री घडला. प्रतिक पवार, रवी बागुल आणि सुमित पगारे या संशयितांनी पीडित मुलीच्या घरात बेकायदा प्रवेश केला. "ही जागा बागुलांची आहे, तुम्हाला येथे राहायचे असेल तर बागुलांच्या बायका म्हणून राहावे लागेल," असे म्हणत मुलीचा विनयभंग केला. यावेळी मुलीची आई तिच्या मदतीसाठी धावून आली असता, नराधमांनी त्यांनाही अश्लील शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात विनयभंग आणि 'पोक्सो' (POCSO) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपनिरीक्षक जे. के. माळी या प्रकरणाचा तपास करत आहेत.

नागरिकांमध्ये संतापाची लाट
शहरात अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटना वाढत असल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दिवसाढवळ्या बागेत आणि रात्रीच्या वेळी थेट घरात घुसून अशा प्रकारचे कृत्य करण्याचे धाडस संशयितांमध्ये येत कुठून? असा सवाल उपस्थित केला जात आहे. पोलिसांनी अशा गुंडांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी जोर धरत आहे.

Comments

No comments yet.