ध्रुवनगरमध्ये हृदयद्रावक घटना...  लोखंडी गेट कोसळले... १३ महिन्यांच्या चिमुरडीचा आईसमोरच मृत्यू...

Share:
Main Image
Last updated: 20-Apr-2026

नाशिक, (प्रतिनिधी) २० एप्रिल - गंगापूर रोडवरील ध्रुवनगर परिसरात एक अत्यंत दुर्दैवी आणि काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. घराच्या इमारतीचे लोखंडी गेट अंगावर पडल्याने आराध्या दीपक मामुलकर या केवळ १३ महिने वयाच्या बालिकेचा मृत्यू झाला. आईसोबत जात असताना हा काळ ओढवल्याने परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.

Advertisement

नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, ध्रुवनगरमधील खंडेराव महाराज मंदिराजवळ असलेल्या महालक्ष्मी निवास (रो-हाऊस क्र. ५०२) येथे मामुलकर कुटुंब वास्तव्यास आहे. रविवारी (दि. २०) दुपारी एक वाजेच्या सुमारास आराध्या आपल्या आईसोबत इमारतीतून बाहेर जात होती. त्याचवेळी इमारतीचे मुख्य लोखंडी गेट अचानक निखळले आणि थेट आराध्याच्या अंगावर कोसळले. हे जड गेट थेट डोक्यावर पडल्याने तिला जबर मार लागला आणि ती जागीच बेशुद्ध पडली. तिचे काका सतीश बाबू सीनगर यांनी आरडाओरड ऐकून धाव घेतली आणि रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आराध्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, दुपारी दोन वाजेच्या सुमारास डॉ. घुटे यांनी तिला तपासून मृत घोषित केले.

हलगर्जीपणा की अपघात?
घटनेची माहिती मिळताच गंगापूर पोलिसांनी रुग्णालयात धाव घेत माहिती घेतली. इमारतीचे गेट नेमके कशामुळे निखळले? गेटच्या देखभाल-दुरुस्तीत काही त्रुटी होत्या का? किंवा हे गेट बसवताना तांत्रिक हलगर्जीपणा झाला होता का? असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत. खेळण्या-बागडण्याच्या वयात अवघ्या १३ महिन्यांच्या चिमुरडीचा असा अंत झाल्याने ध्रुवनगर परिसरातील रहिवाशांनी हळहळ व्यक्त करत प्रशासकीय तपासाची मागणी केली आहे.

Comments

No comments yet.