नाशिक, (प्रतिनिधी) १६ एप्रिल - नाशिकमधील नामांकित आयटी कंपनी 'टीसीएस' (TCS) मध्ये धर्मांतर आणि लैंगिक अत्याचाराचे जे प्रकरण उघडकीस आले आहे, त्यामध्ये दररोज नवनवीन आणि अंगावर शहारे आणणारे खुलासे होत आहेत. पीडित महिलांच्या तक्रारींनंतर आता एका पुरुष कर्मचाऱ्याने समोर येऊन मांडलेली आपबिती ऐकून सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकली आहे. "तुला बाळ होत नसेल, तर तुझ्या पत्नीला माझ्याकडे पाठव," असे अश्लाघ्य वक्तव्य आरोपीने केल्याचा खळबळजनक दावा या कर्मचाऱ्याने केला आहे.
टोपी घालण्याची सक्ती आणि नमाजचे दडपण
पीडित पुरुष कर्मचाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, छळाचा हा प्रकार २०२२ पासून सुरू झाला होता. त्याचा टीम लीडर तौसिफ अख्तर आणि सहकारी दानिश शेख यांनी त्याला लक्ष्य केले होते. या कर्मचाऱ्याला बळजबरीने टोपी घालण्यास भाग पाडले गेले आणि नमाज पठण करण्यासाठी दबाव आणला गेला. इतकेच नाही, तर पीडित कर्मचारी कट्टर शाकाहारी असतानाही नाईट शिफ्टदरम्यान त्याला हॉटेलमध्ये नेऊन मांसाहार करण्यासाठी जबरदस्ती करण्यात आली. नकार दिल्यावर त्याची थट्टा उडवली जायची.
कौटुंबिक दु:खाचा फायदा घेण्याचा प्रयत्न
माणुसकीला काळिमा फासणारा प्रकार तेव्हा घडला जेव्हा पीडित कर्मचाऱ्याचे वडील अर्धांगवायूने (पॅरालिसिस) आजारी पडले. यावेळी तौसिफ, दानिश, शाहरूख आणि रजा मेनन या आरोपींनी "तू इस्लाम स्वीकार, तुझे वडील बरे होतील," असे सांगून त्याचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला. जेव्हा त्याने या गोष्टींना विरोध केला, तेव्हा त्याला नोकरीवरून काढून टाकण्यासाठी मुख्य कार्यालयाकडे खोट्या तक्रारी करण्यात आल्या.
"अंगावर फेकला टेबल फॅन"
पीडिताने सांगितले की, तौसिफने त्याला घरी नेऊन धार्मिक टोपी घालून नमाज पडायला लावली आणि त्याचे फोटो काढून ऑफिसच्या ग्रुपवर टाकून त्याला बदनाम केले. या कृत्याचा जाब विचारण्यासाठी गेला असता, तौसिफने त्याच्या अंगावर टेबल फॅन फेकून मारला आणि जीवे मारण्याची धमकी दिली.
महिला कर्मचारीही शिकार; पोलिसांचा 'सीक्रेट प्लॅन'
या प्रकरणात केवळ पुरुषच नाही, तर मोठ्या संख्येने महिला कर्मचारीही शिकार झाल्या आहेत. एका २३ वर्षीय तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार, दानिश शेखने तिला बळजबरीने जवळ ओढून तिचा विनयभंग केला. तसेच, एचआर निदा खान आणि तौसिफ यांनी हिंदू देवी-देवतांबाबत आक्षेपार्ह विधाने करून धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप आहे.
या गंभीर प्रकरणाचा तपास करण्यासाठी नाशिक पोलिसांनी एका महिला पोलीस अधिकाऱ्याला 'सीक्रेट एजेन्ट' बनवून कंपनीत पाठवले होते. त्यानंतरच या रॅकेटचा पर्दाफाश झाला.
आतापर्यंतची कारवाई:
एकूण गुन्हे: ९ गुन्हे दाखल.
अटक: ५ पुरुष आणि २ महिलांसह एकूण ७ जणांना अटक.
प्रमुख आरोपी: तौसिफ अख्तर, दानिश शेख, एचआर निदा खान, शाहरूख आणि रजा मेनन.
कॉर्पोरेट विश्वात घडलेल्या या प्रकारामुळे नाशिकमध्ये संतापाची लाट असून, यामागे मोठे धर्मांतर रॅकेट असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पोलीस आता या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करत आहेत.