अमरावती, (प्रतिनिधी) १६ एप्रिल - बदनामीच्या धाकाने दबून राहिलेले अमरावतीमधील एक मोठे लैंगिक शोषण आणि ब्लॅकमेलिंगचे रॅकेट अखेर उघड झाले आहे. विशेष म्हणजे, कोणत्याही तक्रारीमुळे नव्हे, तर या प्रकरणातील दोन मुख्य आरोपी अयान अहमद आणि उझैर खान यांच्यातील आपापसातील वादातून या काळ्या कृत्याचा पर्दाफाश झाला.
विकृत पैज ठरली मुलींच्या जीवावर
मिळालेल्या माहितीनुसार, अयान आणि उझैर यांच्यात 'कोण अधिक मुलींना आपल्या जाळ्यात ओढू शकेल' अशी पैज लागली होती. या शर्यतीतूनच त्यांनी मुलींना मोहात पाडून त्यांच्याशी जवळीक साधली. मात्र, हे प्रकरण केवळ प्रेमापुरते मर्यादित न राहता एका विकृत छंदात रूपांतरित झाले. दोघांनीही पीडित मुलींसोबतच्या खासगी क्षणांचे चित्रीकरण केले आणि ते व्हिडिओ ऑनलाइन अपलोड करण्यास सुरुवात केली.
पैशांच्या वादातून व्हिडीओ व्हायरल
अयान अहमद हा एमआयएमचा माजी सदस्य असून तो पक्षाचे सोशल मीडियाचे काम पाहत असे. अयान आणि उझैर यांच्यात पैशांच्या व्यवहारावरून वाद झाला होता. उझैरने अयानकडे काही पैशांची मागणी केली होती, जी अयान पूर्ण करू शकला नाही. या रागातून उझैरने अयानच्या मोबाइलमधील ते आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केले आणि एका मोठ्या गुन्हेगारी साखळीचा अंत झाला.
१८ व्हिडीओ आणि ३९ फोटोंचा थरार
अचलपूर नगर परिषदेचे नगरसेवक मुजीब रशीद यांनी सांगितले की, सुरुवातीला हे प्रकरण एखाद्या प्रेमप्रकरणासारखे वाटले होते. त्यांनी अयानला समज देण्याचाही प्रयत्न केला होता. मात्र, जेव्हा १८ लैंगिक व्हिडिओ आणि ३९ आक्षेपार्ह फोटो समोर आले, तेव्हा हे प्रकरण किती गंभीर आणि नियोजनबद्ध ब्लॅकमेलिंगचे आहे, याची दाहकता स्पष्ट झाली.
शिक्षणाच्या नावाखाली शोषण
मुख्य आरोपी अयान अहमद अचलपूर येथील एका महाविद्यालयात द्वितीय वर्षाला शिकत होता. पीडित मुली वेगवेगळ्या शहरांतील असून त्या शिक्षणासाठी येथे आल्या होत्या. त्यांच्या या असहायतेचा फायदा घेऊन अयान आणि त्याच्या साथीदाराने हे कृत्य केले.
तपासातील आव्हाने
सध्या पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत. मात्र, सामाजिक बदनामीच्या भीतीमुळे पीडित मुली समोर येऊन साक्ष देण्यास धजावत नाहीत. पोलिसांसमोर या मुलींना धीर देऊन त्यांची साक्ष नोंदवणे हे मोठे आव्हान आहे. या प्रकरणातील राजकीय धागेदोरे आणि आरोपींची पार्श्वभूमी पाहता, अमरावती जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे.