नाशिक, (प्रतिनिधी) ६ एप्रिल - शहरातील अत्यंत गजबजलेल्या रविवार कारंजा परिसरात एका रिक्षाचालकाने किरकोळ कारणावरून वाद घालत डॉक्टरच्या कारची तोडफोड केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. 'कार चालकाने दारू पिऊन चौघांना उडवले' अशी खोटी अफवा पसरवून रिक्षाचालकाने जमाव जमवला आणि डॉक्टरला घेराव घातल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी घटना काय?
दिंडोरी रोडवरील पोकार कॉलनी येथे राहणारे डॉ. तेजस उल्हास साकळे हे शनिवारी (दि. ४) रात्रीच्या सुमारास आपल्या कारने पंचवटीकडून मुंबईनाक्याच्या दिशेने जात होते. अहिल्यादेवी होळकर पूल ओलांडून ते सांगली बँक सिग्नलकडे जात असताना, गोरेराम लेनकडून आलेल्या एका रिक्षाने अचानक रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न केला. यावेळी डॉ. साकळे यांनी कार रिक्षाजवळ नेऊन थांबवली.
खोटी अफवा आणि तोडफोड
कार थांबताच रिक्षाचालक गणेश भानूदास रायजादे (४२, रा. मखमलाबाद) याने गोंधळ घालण्यास सुरुवात केली. डॉक्टर घाबरल्याने कारच्या बाहेर उतरले नाहीत. याचा राग धरून संशयित रायजादे याने कारच्या बोनटवर बसून आरडाओरड केली. 'या कार चालकाने दारू पिऊन ४ लोकांना उडवले आहे' अशी खोटी माहिती त्याने ओरडून सांगितल्याने परिसरात मोठा जमाव जमा झाला. संतप्त जमावाने कारला घेराव घातला. याच वेळी संशयिताने सिमेंटचा ब्लॉक कारच्या पुढील काचेवर मारून कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले.
पोलिसात गुन्हा दाखल
या जीवघेण्या प्रकारानंतर डॉ. साकळे यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली. पोलिसांनी गणेश रायजादे आणि त्याच्या २ ते ३ साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक निरीक्षक बैसाणे करत आहेत. ऐन गर्दीच्या ठिकाणी अफवा पसरवून एका डॉक्टरला अशा प्रकारे लक्ष्य केल्याने शहरात चर्चेला उधाण आले आहे.