पहाटेच्या अंधारात जेसीबीने हॉटेल फोडले... ताबा मिळवण्यासाठी भूमाफियांचा राडा...

Share:
Main Image
Last updated: 03-Apr-2026

नाशिक, (प्रतिनिधी) ३ एप्रिल - शहरातील वडाळा रोडवरील हिरवेनगर परिसरात गुरुवारी पहाटेच्या सुमारास भूमाफियांच्या मुजोरीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अज्ञात व्यक्तींनी जेसीबीच्या साहाय्याने एका भंगार गोडाऊनसह हॉटेलवर अनधिकृतपणे तोडफोड करत मिळकतीचा कब्जा घेण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात पाच संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

नेमकी घटना काय?
जहागिर सत्तार शहा (रा. खोडेनगर) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. वडाळा रोडवरील म्हसोबा मंदिर परिसरात शहा यांचे भंगाराचे गोडाऊन आणि बाजूलाच एक हॉटेल आहे. गुरुवारी (दि. २) पहाटे साडेचार ते पाच वाजेच्या सुमारास संशयित आरोपी जेसीबी आणि डंपर घेऊन या ठिकाणी पोहोचले. कोणताही अधिकृत आदेश नसताना त्यांनी थेट गोडाऊन आणि हॉटेलवर जेसीबी चालवून तोडफोड सुरू केली.

Advertisement

महानगरपालिकेची कारवाई समजून गोंधळ
पहाटेच्या वेळी अचानक तोडफोड सुरू झाल्याने हॉटेलमध्ये झोपलेले कारागीर दचकून जागे झाले. सुरुवातीला महानगरपालिकेची अतिक्रमणविरोधी मोहीम सुरू असावी, असे त्यांना वाटले. मात्र, कोणतीही पूर्वसूचना किंवा सरकारी अधिकारी सोबत नसल्याचे पाहून हा प्रकार खासगी वादातून जमीन बळकावण्यासाठी सुरू असल्याचे त्यांच्या लक्षात आले.

शेळ्या जखमी, मोठे नुकसान
कामगारांनी आरडाओरड करत मालकांशी संपर्क साधला. स्थानिक नागरिक जमा होत असल्याचे पाहून तोडफोड करणाऱ्या टोळक्याने घटनास्थळावरून पळ काढला. या तोडफोडीत गोडाऊन आणि हॉटेलचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे, गोडाऊनमध्ये असलेल्या काही शेळ्या देखील या घटनेत जखमी झाल्या आहेत.

पाच जणांवर गुन्हा दाखल
याप्रकरणी पोलिसांनी तौसिफ इनामदार, मकसुद इनामदार, साजिद मुलतानी, पवन वाडेकर आणि जेसीबी चालक यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. जमिनीच्या वादातून हा प्रकार घडला असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. सहायक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Comments

No comments yet.