रिक्षात बसून प्रवाशांना लुटणारी टोळी पुन्हा सक्रिय... मुंबई नाका पोलिसांत गुन्हा दाखल...

Share:
Main Image
Last updated: 02-Apr-2026

नाशिक, (प्रतिनिधी) २ एप्रिल - शहरात रिक्षा प्रवाशांना लुटण्याचे सत्र सुरूच असून, गडकरी चौक ते महामार्ग बसस्थानक प्रवासादरम्यान एका तरुणाला लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रिक्षाचालक आणि त्याच्या इतर तीन साथीदारांनी संगनमत करून मालेगाव येथील एका तरुणाला शिवीगाळ व दमदाटी करत त्याच्या खिशातील २५ हजार रुपयांची रोकड बळजबरीने काढून घेतली. याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रतिक मोहन निकम (रा. सोनज, ता. मालेगाव) या युवकाने यासंदर्भात फिर्याद दिली आहे. निकम हा रविवारी (दि. १) कामानिमित्त नाशिक शहरात आला होता. दुपारी गडकरी चौकातून महामार्ग बसस्थानकाकडे जाण्यासाठी तो एमएच १५ एफयू २७८६ या रिक्षात बसला. यावेळी रिक्षात चालकासह इतर तीन प्रवासी आधीच बसलेले होते.

Advertisement

झुडिओ शोरूमसमोर उतरवून पोबारा
रिक्षा बसस्थानकाच्या दिशेने जात असताना, रिक्षातील संशयितांनी निकम याला प्रवासात विनाकारण शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्याचे लक्ष विचलित करून आणि त्याला धमकावून संशयितांनी त्याच्या खिशातील २५ हजार रुपयांची रोकड बळजबरीने काढून घेतली. त्यानंतर संशयितांनी कालिकामाता मंदिर परिसरातील 'झुडिओ' शोरूमसमोर निकम याला रिक्षातून उतरवून दिले आणि रिक्षासह तिथून वेगाने पोबारा केला.

पोलिसांकडून शोध सुरू
फसवणूक झाल्याचे लक्षात येताच निकम याने मुंबई नाका पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. पोलिसांनी रिक्षा क्रमांकावरून संशयितांचा शोध सुरू केला आहे. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे रिक्षा प्रवासाच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक समद बेग करत आहेत.

Comments

No comments yet.