नाशिक, (प्रतिनिधी) २ एप्रिल - दिंडोरी रोडवरील कुलकर्णी फार्म परिसरात रिक्षाचालकाच्या बेजबाबदारपणामुळे भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. भरधाव वेगात स्टंटबाजी करत रिक्षा चालविणाऱ्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने रिक्षाने दुचाकीला धडक दिली. या अपघातात रिक्षातील १० विद्यार्थिनी जखमी झाल्या असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात रिक्षाचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेली माहिती अशी की, बुधवारी (दि. १) दुपारी महाविद्यालय सुटल्यानंतर ११ विद्यार्थिनी एमएच १५ जेए ५०९३ या रिक्षाने घरी जात होत्या. क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांना बसवून रिक्षाचालक दिंडोरी रोडने भरधाव वेगात वाहन चालवत होता. कुलकर्णी फार्म परिसरात त्याने इतर वाहनांना ओव्हरटेक करण्याच्या नादात आणि स्टंटबाजी करताना पुढे जाणाऱ्या एका दुचाकीला जोरदार धडक दिली.
दुचाकीस्वारासह विद्यार्थिनी जखमी
ही धडक इतकी भीषण होती की, दुचाकीस्वारासह रिक्षातील मुलींना गंभीर दुखापत झाली. या अपघातात आशिका मनोज गांगोडा, अर्चना पंडित चौरे, भूमिका वसंत हाबल्या, वैशाली नरेश धांगडा, वत्सला मधु करबट, वैतरणा मधु करबट, योगिता संतोष वाढू, सविता रमेश धांगडा, रसिका वसंत मेघवाले व अंकिता रामजी रजपूत अशी जखमी विद्यार्थिनींची नावे आहेत. यातील सात मुलींना उपचारासाठी तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पोलिसात गुन्हा दाखल
याप्रकरणी तेजल वनश्या मांगात (रा. वाढणे कॉलनी, म्हसरूळ) या विद्यार्थिनीने दिलेल्या फिर्यादीवरून म्हसरूळ पोलिसांनी रिक्षाचालकाविरोधात गुन्हा नोंदवला आहे. अकरा मुलींना रिक्षात बसवून धोक्याची वाहतूक केल्याबद्दल आणि स्टंटबाजी करून अपघातास कारणीभूत ठरल्याबद्दल चालकावर कारवाई करण्यात येत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास हवालदार राजेश जगताप करत आहेत.