बुवाबाजीच्या भीषण वास्तवाचा होणार पर्दाफाश...  राज्यभरातून ३०० जण येणार नाशकात...

Share:
Main Image
Last updated: 30-Mar-2026

नाशिक, (प्रतिनिधी) ३० मार्च - नाशिकमधील भोंदू खरात बुवाचे लैंगिक आणि आर्थिक शोषणाचे रॅकेट उघडकीस आल्याच्या पार्श्वभूमीवर, बुवाबाजीच्या भीषण वास्तवाचा पर्दाफाश करण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने नाशिकमध्ये राज्यस्तरीय फलज्योतिष आणि बुवाबाजी विरोधी संघर्ष परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ही परिषद ३ एप्रिल रोजी सकाळी १० ते ५ या वेळेत खुटवड नगर येथील सिटू भवन येथे पार पडणार आहे. या परिषदेची माहिती राज्य कार्याध्यक्ष संजय बनसोडे आणि राज्य प्रधान सचिव डॉ. ठकसेन गोराणे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. 'महा अंनिस'ने गेल्या ३६ वर्षांत हजारो भोंदू बाबांचा पर्दाफाश केला असून, कार्यकर्त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळेच अनेक भोंदूंना जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत शिक्षा झाली आहे. याच संघर्षाला अधिक धार देण्यासाठी या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

दिग्गजांची उपस्थिती आणि मार्गदर्शन
या परिषदेचे उद्घाटन खासदार वर्षा गायकवाड यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत, ज्यात प्रामुख्याने:
प्राचार्य डॉ. नितीन शिंदे
बाबासाहेब बुधवंत (सेवानिवृत्त पोलीस उपायुक्त)
डॉ. जयंत ढाके (मानसोपचार तज्ज्ञ)
कॉ. डी. एल. कराड व ॲड. रंजना गवांदे
माधव बावगे (राज्य अध्यक्ष, महा अंनिस) व संजय बनसोडे (राज्य कार्याध्यक्ष)

Advertisement

लोकप्रबोधन रॅली आणि समारोप
परिषदेच्या शेवटी एका भव्य लोकप्रबोधन रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. ही रॅली हुतात्मा स्मारक येथून निघून छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करेल. परिषदेचा समारोप ज्येष्ठ साहित्यिक व संपादक उत्तम कांबळे यांच्या भाषणाने होईल.
या परिषदेत बुवाबाजीच्या विरोधात काही महत्त्वपूर्ण संकल्प आणि निर्धार केले जाणार आहेत. या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी डॉ. ठकसेन गोराणे, विनायक सावळे, कृष्णा चांदगुडे, प्रा. आशा लांडगे, अरुण घोडेराव यांच्यासह नाशिकमधील कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत. राज्यभरातून ३०० हून अधिक प्रतिनिधी या परिषदेसाठी उपस्थित राहणार आहेत.

अधिक माहितीसाठी कृष्णा चांदगुडे (९८२२६३०३७८) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Advertisement

Comments

No comments yet.